कोकणातील रिफायनरी कामा दरम्यान राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात झालेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. एमआयडीसीचे अधिकारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी येणार आहे. अधिकारी भेटून, चर्चा करुन प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत माघार न घेण्यावर ग्रामस्थ पूर्ण ठाम आहेत. शासन, स्थानिक प्रशासन विश्वासात न घेता रिफायनरी संबंधित काम करत असल्याने रिफायनरी विरोधकांचा रोष वाढला आहे.
रिफायनरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राजापूर तालुक्यामधील शिवणे खुर्द गावच्या सड्यावर बुधवारी ८ जून दुपारी तीन वाजल्यापासून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली होती. गावात माती परीक्षण, ड्रोनमार्फत सर्व्हे केला जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर शिवणे खुर्दच्या सड्यावर येत नागरिकांनी ठिय्या मांडला. जवळपास ६०० नागरिक सर्वेक्षण विरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये महिला पुरुष, तरुण वृद्ध यांचा सहभाग जास्त होता.
दुपारी तीन वाजता सुरु झालेलं ठिय्या आंदोलन पहाटेपर्यंत सुरु ठेवल होतं. नागरिकांनी काळ्या कुट्ट अंधारात उघड्या माळरानावर आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता रिफायनरी विरोधी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. शासन, प्रशासन जोपर्यंत ठोस उत्तर देत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर नागरिकांचा विरोध पाहता प्रशासनाने दखल घेतली आहे.
विरोधी संघटना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सोमवारी निवेदन दिले आहे. या परिसरात कातळावर मोठ्या अक्षरात ‘रिफायनरी रद्द असे लिहून घोषणा देत तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक झाली आहे. कंपनीकडून या परिसरात सुरू असलेले सर्व्हेक्षण काम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.