संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदीच्या उपनद्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते पुढील आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. गाळ काढल्यामुळे गडनदीच्या उपनद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. तसेच माखजन बाजारपेठेची पुरातून सुटका होणार आहे. या मोहिमेमुळे नदीची खोली दहा ते बारा फूट झाली असून, पात्रही रुंद झाले आहे. गडनदीच्या उपनद्यांमध्ये गाळ साचल्यामुळे नदीचे पात्र उथळ झाले होते. त्यामुळे पावसाचे पाणी थेट माखजनच्या बाजारपेठेत शिरत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे पावसाळ्यात दरवर्षी नुकसान होत होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढणे गरजेचे होते. प्रामुख्याने माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम करणे गरजेचे होते. ग्रामस्थांनी या कामासाठी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळातून पूर नियंत्रण योजनेअंतर्गत २६ लाखांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि जलसंपदा विभागाने गाळ काढण्यास सुरवात केली.
डिसेंबर २०२४ पासून दोन पोकलेनच्या साह्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले ते आतापर्यंत चालू आहे. परिसरातील ग्रामस्थ गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करतात आणि जलसंपदा विभागाच्या कामगारांना योग्य त्या सूचना करतात. त्यामुळे मागील अडीच महिने गाळ काढण्याचे काम गतीने सुरू आहे. नदीतून काढलेला गाळ टाकण्यासाठी माखजनसह कासे, सारंग गावातील मोकळ्या जागा ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या ठिकाणी गाळ टाकण्यात आल्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रात पुन्हा गाळ येणार नाही. हे काम करण्यासाठी तीन डंपर कार्यरत आहेत. आतापर्यंत ६५ हजार घनमीटर गाळ नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. हे काम अजून सुरूच राहणार आहे. मुसळधार पाऊस पडला की, गडनदीच्या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरते त्यामुळे येथील व्यावसायिकांना सतर्क राहावे लागत होते. पावसाला सुरुवात झाली की, दुकानातील माल सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडते.
गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे हा पुराचा प्रश्न सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या काढलेल्या गाळामुळे नदीपात्रात पाणी वाहत असून, त्यावर किनारी भागातील लोकांनी कलिंगड लागवडीला सुरुवात केली आहे. आपसूकच येथील गावातील पडीक जमिनीत दुबार शेती करता येईल. दरम्यान, माखजन बाजारपेठ ते गडनदी विसर्जन घाट नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली आणि ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. याला निधी देण्यासाठी आमदार निकम यांनी प्रयत्न केले होते.
नदी पात्र ३० मीटरने रुंदावले – गेली अडीच महिने नदीतील गाळ काढण्याचे काम चालू आहे. जलसंपदा विभागाच्या सहकार्यामुळे गाळ काढण्याच्या कामातील लोकांच्या निवासाची व्यवस्था नागरिकांनी केली. आतापर्यंत सुमारे ९०० मीटर नदीपात्रातील गाळ काढण्यात आला आहे. गाळ काढल्यानंतर माखजनसह सरंग आणि कासे गावाला फायदा होणार आहे. यापूर्वी नदी केवळ पाच फूट खोल होती. गाळ काढल्यामुळे ती दहा ते बारा फूट खोल झाली आहे. नदीचे पात्र ३० मीटरने रुंद झालेले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक गावात गाळमुक्त नदी मोहीम राबविण्याची गरज आहे, असे माखजनचे सरपंच महेश बाष्टे यांनी सांगितले.
नुकसान टाळता येणार – माखजन बाजारपेठेत २० दुकाने असून, नदीकिनारी परिसरात ६० घरे आहेत. तसेच २१ एकर शेती आहे. पुरामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसतो. भातशेतीचेही मोठे नुकसान होते. वर्षाला १० ते १२ लाखांचा फटका बसतो. गडनदीच्या उपनद्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे होणारे नुकसान टाळता येईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.