गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा लांजा तालुक्यातील पन्हळे गावातील भातशेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. तयार झालेली हळवी भातशेती शेतातच आडवी झाली असून पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाचा हंगाम उलटून गेला तरी, देखील पावसाचे प्रमाण अद्याप कमी न झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग प्रचंड चिंतातूर झाला आहे. सतत कोसळणारा पाऊस हा भातशेतीसाठी मारक ठरत आहे.
सध्या हळवे पीक कापणीस तयार झाले असून, चार दिवसात पावसाचे वातावरण बघून भातशेती कापण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. मात्र सकाळी ऊन तर सायंकाळी गडगडाटी पाऊस अशा समीकरणामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. कापलेले भात वाळवायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे तयार भातपीक शेतातच आडवे झाले आहे.
परिसरात गेले काही दिवस सायंकाळच्या सत्रात विजेच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात आली आहे. विजेच्या लंपडावामुळे नागरिक हैराण झाले असून संततधार पावसामुळे परिसरातील रस्ते खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. हळवी भातशेती तयार होऊनही पावसामुळे कापणी खोळंबल्याने मोठे नुकसान होत आहे.
भाताच्या वाफ्यात देखील भरपूर प्रमाणात चिखल व पाणी साचल्याने कापणी कामात अडथळे निर्माण होत आहेत. सध्या पडणारा पाऊस भातशेतीस पूरक असला तरी हळव्या भातशेतीस मात्र मारक ठरत आहे. अनेक ठिकाणी कापणी सुरू झाल्याने पावसापूर्वी भात घरात कसे येईल, याची शेतकऱ्याला धास्ती लागली आहे; मात्र मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने दुपारनंतर कामे खोळंबत आहेत. त्यामुळे परतीचा पाऊस शेतकरीवर्गासह नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

