राजकीय झेंडे बाजूला ठेवून रिक्षाचालक-मालक यांनी संघटनेचा काळा-पिवळा झेंडा हाती घेण्याचा निर्धार रत्नागिरीत झालेल्या मेळाव्यात रिक्षाचालक-मालकांनी केला. हिवाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील मंत्री, आमदार, खासदार यांना रिक्षाचालकांच्या महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. रिक्षाचालक-मालक संघटनेच्या कोकणस्तरीय सभेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. रिक्षाचालक-मालक कृती समितीचे पुणे येथील नितीन पवार, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक, सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर उपस्थित होते.
सुधीर पराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व राज्यस्तरीय झालेल्या कामांचा आढावा सादर केला. ते म्हणाले, कोरोना कालावधीत मुंबईवरून ट्रान्स्फर होऊन आलेले रिक्षा परवाना रद्द झाले पाहिजेत. संतोष नाईक यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेल्वेस्टेशनला रिक्षा स्टँड मंजूर करणे, नोकरीमध्ये असलेल्या व निवृत्त झालेल्या कामगारांचे रिक्षा परवाने रद्द झाले पाहिजेत, आरटीओ संबंधित येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी, याचे मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरटीए कमिटीची मीटिंग होऊन त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून रिक्षासंबंधित निर्णय घेण्यात यावे, अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिक्षा संघटनेत काम करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करावे व रिक्षा संघटनेचा काळा-पिवळा झेंडा हाती घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी नितीन पवार म्हणाले, २०१४ च्या अहवालाप्रमाणे रिक्षाचालक-मालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना रिक्षाचालकांच्या महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात यावे. सीएनजी कमी दाबाने मिळत असल्यास वजनमाप विभागाकडे निवेदन देऊन गॅसमापाची यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या सरकारकडे मांडण्यात याव्यात.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर यांच्यासह सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. राज्यातील प्रत्येक विभागात रिक्षाचालक-मालक यांची परिषद घेऊन जनजागृती केली जाणार आहे. मीटरसाठी मीटर अॅप वापरण्याची परवानगी द्यावी, यावर चर्चा झाली. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या सहमतीने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून प्रताप भाटकर यांची नेमणूक झाल्याची घोषणा संतोष नाईक यांनी केली.

