गेले २२ दिवस सुरु असलेल्या एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील जनतेवर जास्त विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या संपाचा फायदा मात्र खाजगी वाहनांना होत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्यांना दुसरा काहीच पर्याय उपलब्ध नसल्याने अवाच्या सव्वा भाडे देऊन कामासाठी शहरी भागामध्ये यावे लागत आहे. नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
जनसामान्यांचे वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे काम सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक दिवस बंद आहे. याचा मोठा परिणाम ग्रामीण भागावर झाला आहे अल्प मोबदल्यात व सुरक्षितरीत्या शहरात येण्यासाठी ग्रामीण भागातील जनता या लालपरीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करते. मात्र गेले काही दिवस संपामुळे ही वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल झाले आहेत.
ग्रामीण भागात राहणार्या एकटय़ा दुकटय़ा महिलांना व वृध्दांना कितीही उशीर झाला तरी गावात जाणारी शेवटची एसटी हा मोठा आधार असतो. आजारपणात आवश्यक असलेली औषधे व अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात येण्यासाठी त्यांना एसटीचा उपयोग होत असतो. मात्र गेले काही दिवस वाहतूक नसल्याने या सर्वांचे मोठे हाल सुरू आहेत.
खेड्यापाड्यातील राहणारे शाळेचे विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी यांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय खेडोपाड्यातून शहराकडे कामावर येणाऱ्या कामगारांना खाजगी वाहनातून शहराकडे यावे लागल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील लोक शहराकडे येत नसल्याने शहरातील बाजारपेठेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. यामुळे सरकार व संपकरी कर्मचार्यांनी समन्वय साधून सामंजस्याने यातून मार्ग काढावा व एसटीची वाहतूक पूर्ववत करून सामान्य जनतेचे हाल थांबवावेत अशी मागणी जनतेतून केली जात आहे.