१ जानेवारी २०२२ पासून नवीन मच्छीमारी कायद्याप्रमाणे पर्ससीन मासेमारी बंदीचा काळ सुरु होत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या क्षेत्रात नवीन वर्षापासून पर्ससीन मासेमारी नौकेने प्रवेश करून मासेमारी केल्यास अशा नौकावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. आणि नव्या कायद्यानुसार दंडाची रक्कम सुद्धा दुप्पट आकारण्यात येणार असल्यामुळे मच्छिमारांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. जर बंदीच्या काळामध्ये कोणतीही पर्ससीन नौका मासेमारी करताना आढळल्या तर त्यांना पहिल्या वेळेस पकडल्यावर दंड म्हणून १ लाख रुपये आणि नौकेवर सापडलेल्या मासळीच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे.
जिल्ह्यातील साखरीनाटे परिसरातील पर्ससीननेट नौकांकडून खोल समुद्रात राजरोसपणे मासेमारी केली जात असल्याचा आरोप स्थानिक पारंपरिक मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. एलईडी, पर्ससीननेट, मिनी पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या मत्स्य विभागाच्या नव्या कायद्याचा चांगलाच फायदा मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून उठविला जात असल्याचे म्हटले जात आहे.
गेले काही दिवसांपासून आपली ठराविक हद्द सोडुन परराज्यातील वेगवान नौका येऊन मासेमारी करत असल्याच्या तक्रारी स्थानिक मत्स्य व्यवसायिकांककडून येऊ लागल्या आहेत. एकीकडे एलईडी, पर्ससीननेट प्रकारातील मासेमारीला बंदी असतानाही देखील ही मासेमारी मात्र तेजीत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या मासेमारीकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोपही पारंपरिक मच्छिमारांनी केला आहे.
परराज्यातील आणि बेकायदेशीर पर्ससीननेट धारकांची मासेमारी मात्र पारंपारिक मासेमारी करणाऱ्यांना डोईजड होऊ लागली आहे. पारंपारिक मासेमारीचा वेग कमी असल्याने त्याच अवधीमध्ये वेगवान नौका अनेक प्रकारची मच्छी पकडून घेऊन जातात. त्यामुळे या पारंपारिक मासेमारीसाठी मासळीच उरत नाही. आणि वेगवान नौकेच्या स्पीड मुळे मासे खोल समुद्रात जातात त्यामुळे त्यामध्ये पारंपारिक मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.