समाजाला दिशा देण्यासाठी आणि समजाच्या हितासाठीच मी आजवर भूमिका घेत आलो आहे. सहा वर्षात मी कुठेही राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल असं वागलेलो नाही. जनसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्वाची आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे यापुढे मी कोणत्याही पक्षाचा नसून मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असून ‘स्वराज्य’ नावाच्या संघटनेची स्थापन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे.
पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आपल्या पुढील प्रवासाची दिशा जाहीर केली आहे. लोकांना संघटीत करण्यासाठी, समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी आणि गोरगरीबांचं कल्याण कऱण्यासाठी मी एक संघटना स्थापन करत आहे. या संघटनेचं नाव ‘स्वराज्य’ असं आहे. या महिन्यातच लोकांची भावना समजून घेण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे”, असं संभाजी राजे म्हणाले. यात मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, अशी घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील केलं.
पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेनं छत्रपती घराण्यावर आजवर खूप प्रेम केलं. सत्तेत राहून मी अनेक कामं करू शकलो. समाजहित ज्यात असेल त्याची बाजू मी कायमच घेत आलो आहे. महाविकास आघाडी असो किंवा भाजपा असो. ज्यावेळी समाजहित मला जिथं दिसलं तिथं मी माझी स्पष्ट बाजू मांडत आलो आहे. त्यामुळे माझं सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहकार्य करावं.
“मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करतोय. मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. मी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मी कुठल्याही पक्षात जात नाही आहे”, असं संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केलं.