कोकणातील रेल्वेने घडणारा प्रवास म्हणजे स्वर्गसुख. परंतु, कोरोना काळामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे रेल्वेच्या अनेक सोयी सुविधांमध्ये बदल घडून आले आहेत. कोकणात दाखल होताना लागणारे एक सुंदर निसर्गरम्य रेल्वेस्थानक म्हणजे संगमेश्वर रोड. पण येथील रेल्वे स्थानकांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याने संगमेश्वरवासीय त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा रेल्वेस्थानकाच्या बोर्ड पासून, रस्ते ते सुविधांसाठी स्थानिकांनी आंदोलने केली परंतु, परिस्थितीत काहीच बदल न घडता जैसे थे च स्थिती आहे.
कोविड १९ च्या अगोदर बुकिंग खिडकी संगमेश्वर स्थानकामध्ये सुरू होती. पण ती आता बंद करण्यात आली आहे. इंटरनेटद्वारे तिकिटाचे बुकिंग होते, मात्र नेटवर्कच्या एवढ्या समस्या उद्भवत असल्याने ऑनलाईन सुद्धा कामामध्ये अनेक अडचणी येत आहेत. तसेच चिपळूण आणि रत्नागिरी हि स्थानके देखील लांब एक तासाच्या अंतरावर असल्याने, आरक्षणासाठी प्रवाशांना धावाधाव करावी लागते.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनाची हालतच खराब होते तर चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा खड्ड्यातून वाट काढत जाणे हालाखीचे बनले आहे. रेल्वे स्थानकांमध्ये जे प्रसाधनगृह आहे, त्याची अवस्था देखील दयनीय बनली आहे.
फलाटावर पेव्हर ब्लॉक अनेक दिवस दुरुस्ती केली नसल्याने काही ठिकाणी खचलेले दिसत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. या आणि अशा विविध मागण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुप यांच्या वतीने पत्रकार संदेश जिमन यांनी रेल्वे प्रशासनाला विनंती अर्ज दिला आहे. रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांचा प्रशासनाने त्वरेने गांभीर्याने विचार करावा, नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ग्रुपने दिला आहे.