संगमेश्वर तालुक्यातील धामापूर सप्रे वाडीत पाणी पुनर्वापरासाठी सात लाख रुपये खर्चून बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, या बंधाऱ्यात त्याच्या उंची एवढा गाळ साचल्याने त्यामध्ये पाणी साठत नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना त्या लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बंधार्याचा काडीमात्र उपयोग होत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बंधाऱ्यातील गाळ यावर्षी तरी काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमार्फत करण्यात आली आहे.
धामापूर सप्रे वाडीत उभारण्यात आलेला बंधारा गाळाने भरलेला असल्याने यात ना पाणी अडते ना ग्रामस्थांसाठी याचा काही उपयोग होत अशी सद्य स्थिती आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापासून ग्रामपंचायती मार्फत गावातील ओढ्यांवर आवश्यक ठिकाणी बंधारे बांधण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र, यातील बहुतेक बंधारे हे काही कालावधीतच निरुपयोगी ठरत आहेत.
बंधारा दिसत असतो मात्र त्यामध्ये थेंबभरही पाणी साठत नाही अशी परिस्थिती आहे. तालुक्यात आणि पूर्ण जिल्ह्यात किती बंधारे बांधून झाले या आकडेवारीवरच मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. पण गेल्या अनेक वर्षात या स्थितीत काहीच बदल घडून आलेला नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासून परत पाणी टंचाई निर्माण होत असल्याने, गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यावर अधिक भर दिला जातो.
गावातील बंधाऱ्यांचा उपयोग जवळपासच्या विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ व्हावी, जनावरांना पाणी पिता यावे, महिला वर्गाला कपडे धुण्याकरिता व्हावा यासारख्या अनेक कारणांसाठी होणे अपेक्षित आहे. शासन आपल्या स्तरावरुन यासाठी दरवर्षी निधी मंजूर करते. मात्र, योग्य नियोजन, कामाचा निकृष्ट दर्जा , निधीच्या खर्चाबाबत अनियमितता यासारख्या अनेक कारणांमुळे पाण्याऐवजी बंधाऱ्यात निधी जिरतो आणि बंधारे कोरडेच रहातात.