राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या मुद्द्यावर देखील सध्या चर्चा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी मानेच्या त्रासामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच मुख्यमंत्री एका कार्यक्रमा निमित्त बाहेर दिसले होते. मात्र, यावरून आता भाजपानं मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी विश्वासाचे म्हणून निदान आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देण्याचा देखील खोचक सल्ला भाजपाकडून देण्यात आला.
राज्याने उपचार काळामध्ये मुख्यमंत्र्यांना पाहिलेल नाही, असं चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. ४५ दिवस राज्याच्या जनतेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दर्शन झालेले नाही. आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही चांगले बरे व्हा ना. तुमची प्रकृती ठीक नसेल तर चार्ज दुसर्याकडे द्या. एक दिवस विदेशात जायचं असेल, तरी चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कुणावर भरवसाच राहिलेला नाही आहे. तुमचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विश्वास नसणे स्वाभाविकच आहे. पण निदान स्वत:च्या ताब्ब्येतीसाठी तुम्ही चार्ज ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे तरी द्या. कुणीतरी विश्वासातील माणूस हवा ना”, आता उद्धव ठाकरे यांचा स्वत:च्या मुलावरही विश्वास राहिला नाही का ? असे चंद्रकांत पाटील यांनी खोचकपणे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या खोचक वक्तव्यावर शिवसेनेचे खास. संजय राउत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेत त्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “राज्य कसे चालवायचे यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही आणि तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत आणि मंत्रीमंडळ उत्तम काम करत आहे चंद्रकांत पाटील यांना माहित आहे. सल्ले कशाला देताय. विरोधीपक्षाचे काम चोखपणे करा,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.