रत्नागिरीमध्ये शिक्षणाच्या सुविधा उत्तम दर्जाच्या असल्या तरी, रत्नागिरीचे नाव शैक्षणिक उपक्रमांमध्ये अजून उंचावले जाईल यासाठी नाम. उदय सामंत कायम झटत असतात. रत्नागिरी मधील इच्छुक माणसाला उच्च शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरी बाहेर मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जावे लागते, प्रत्येकाचीच बाहेर राहण्या-खाण्याची व्यवस्था व्यवस्थित होतेच असे नाही, त्यामुळे रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना तसेच विविध शिक्षण घेण्यास उत्सुक असणाऱ्या सर्वांनाच उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा इथेच उपलब्ध व्हाव्यात यासाठी नाम. सामंतांचा खटाटोप सुरु आहे.
रत्नागिरी मध्ये शैक्षणिक नवीन प्रकल्प सुरु होणार असून त्यातील, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर अंतर्गत रत्नागिरी येथे उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना नाम. उदय सामंत यांनी केल्या आहेत.
मंत्रालयामध्ये यासंदर्भात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपकेंद्राचे समन्वय डॉ. दिनकर मराठे, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कुलगुरू श्रीनिवास वरखेडी आणि संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यावेळी नाम. सामंत म्हणाले, उपकेंद्रासाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, परंतु, उपकेंद्राचे काम वेगाने सुरू होणे आवश्यक आहे. रत्नागिरी उपकेंद्र स्वयंपूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ यांच्याशी समन्वय करून बीएस्सी. हॉस्पिटँलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला तर, रत्नागिरी हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने, परिसरातील पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना त्याचा नक्कीच लाभ होईल. तसेच स्थानिकांना देखील रोजगार निर्मिती होऊन प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार होईल.
सध्याच्या घडीला या उपकेंद्रामध्ये सन २०२१-२२ करिता एम.ए (संस्कृत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र), बी.ए.(योगशास्त्र), बीसीसीए.पदविका (संस्कृत,योग, वास्तुशास्त्र) आणि सन २०२२-२३ पासून सुरू होणार अभ्यासक्रम बी.एससी.(हॉस्पिटँलिटी स्टडीज), बी.बी.ए, बी.ए,(सव्हील सर्व्हिसेस, कौशल्य विकासोन्मुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.