दरवर्षी कोकण किनारपट्टीवर नोव्हेंबर ते मार्च महिन्या दरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे अंडी घालण्यासाठी येतात. मँग्रोव्ह फाऊंडेशनने अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच संशोधनाच्या उपक्रमात पहिल्या टप्प्यामध्ये पाच मादी कासवाच्या पाठीवर सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात येणार आहे. दोन कासवांना २५ जानेवारी रोजी मंगळवारी मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले आहेत.
भारतातील पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या या उपक्रमातील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पहिल्या दोन मादी कासवांना हे उपकरण बसवण्यात पथकाला यश आले आहे. कोकण किनारपट्टीवर विणीच्या हंगामात येणाऱ्या या सागरी मादी कासवांच्या अभ्यासाकरिता हे यंत्र बसवण्यात आले आहे. कोकणातील वेळास व आंजर्ले येथील दोन मादी कासवांना मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावून यशस्वीरीत्या समुद्रात सोडण्यात आले आहे.
या अद्ययावत तंत्रज्ञान वापरलेल्या कासव संशोधन प्रकल्पाचा अंदाजे खर्च ९ लाख ८७ हजार रुपये एवढा अपेक्षित आहे. कोकणात रत्नागिरी जिल्हयात वेळास, आंजर्ले, गुहागर येथे ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी घरटयात संरक्षित करून त्यांच्या पिल्लांना समुद्रात सोडले जाते. हा अभ्यास प्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत राबवण्यात येत आहे.
पश्चिम किनारपट्टीवर प्रथम केला गेलेला हा सागरी प्रयोग असून, पहिल्या मादी कसवाचे ‘प्रथमा’ ठेवण्यात आले आहे तर दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाला सावनी नाव देण्यात आले आहे.
ऑलिव्ह रिडले मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ बसवण्यात आले. मंगळवारी सकाळी तिला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. या कासवांच्या अभ्यासासाठी स्थलांतरावर ‘डब्लूआयआय’चे संशोधकांचे लक्ष ठेवून आहेत. यावेळी मँग्रोव्ह फाऊंडेशनचे उपसंचालक डॉ. मानस मांजरेकर, कांदळवन विभाग रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे, धनश्री बगाडे, समन्वयक मोहन उपाध्ये उपस्थित होते.