कोयना धरणाच्या सुरक्षेबाबत सरकारने दक्षता घेतली आहे. कोयनेच्या परिसरात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे त्याचा कोयना धरणावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने हे काम हाती घेतल्यामुळे कोयना धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. भूकंप मापनाचे काम भारतीय हवामान विभागाकडे आहे. या विभागाचे एक केंद्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या नाशिक मुख्यालयात आहे. धरण सुरक्षितता कायदा लागू झाल्यामुळे धरणांच्या आरोग्याकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे कोयना धरण सुरक्षितता विभागाने प्राधान्यक्रम बदलला आहे. कोयना परिसरात ११ डिसेंबर १९६७ ला सहा रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर १ ते ३ रिश्टर स्केलचे भूकंप या परिसरात नेहमी होत असतात. कोयना, पाटण, हेळवाक आणि पोफळीतील सह्याद्री घाटपरिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. या भागात भूकंप झाल्यानंतर पाटण, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर, खेड भागातील गावांमध्ये त्याचे धक्के बसतात. भूकंपमापनाऐवजी भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.
त्याचा भविष्यातील धरणांच्या रचनेत उपयोग होईल. त्याअनुषंगाने भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी त्वरण आलेखी उपकरणे (स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ) बसवण्याचे निश्चित झाले. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवले. धरणातील जलसाठा, भूगर्भातील हालचाली आदींचा वेध घेण्यासाठी धरणात विविध प्रकारांची उपकरणे कार्यरत असतात. सहा महिन्यांपूर्वी कोयनेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बैठकीत धरणाच्या सुरक्षितता विभागाने प्रमुख धरणांमध्ये भूकंप मापनासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोयना धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरील भागात प्रत्येकी तीन उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यामार्फत संकलित माहितीद्वारे धरणाच्या संभाव्य नुकसानीचा अभ्यास करता येणार आहे.