रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांची इंडिया आघाडीच्या समन्वयक पदावर निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे साहजिकच विनायक राऊत यांची राष्ट्रीय राजकारणात इन्ट्री झाली आहे. विधानसभेचे आमदार तसेच विनायक राऊत यांनी शिवसेनेत शाखाप्रमुख पदावरून राजकारणाला सुरुवात केली. मुंबईमध्ये नगरसेवक, विधानपरिषद आमदार अशी कारकीर्द गाजवल्यानंतर शिवसेनेच्या मुख्य कार्यकारिणीत त्यांना सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच शिवसेनेकडून कोकणची जबाबदारी देखील विनायक राऊत यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
कोकणात उत्तमपणे संघटना बांधणी केल्यामुळे त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून गेले. या काळात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून पक्षात जागा निर्माण केली. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर देखील विनायक राऊत पक्षा बरोबर आणि उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ठाम राहिले. पक्ष फुटीनंतर अत्यंत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडत कोकणात व अन्य ठिकाणी देखील कार्यकर्त्यांना बळ दिले. साहजिकच पथाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचे नाव नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.
त्यामुळे आगामी काळात विनायक राऊत यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असे संकेत मिळत होते. दरम्यान देशातील सुमारे २८ पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. भाजपला शह देण्यासाठी हे पक्ष एकत्र आले असून त्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे नाव अग्रस्थानी आहे. आता पुढील लोकसभा निवडणुका पाहता इंडिया आघाडीने वेगवेगळ्या समित्या स्थापन केले असून त्यामध्ये समन्वय समितीचे देखील गठन करण्यात आले आहे. या समितीत इंडिया आघाडीचे समन्वयक म्हणून विनायक राऊत यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून विनायक राऊत यांची थेट राष्ट्रीय राजकारणात इन्ट्री झाली आहे.