कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांचा शोध लावल्याचा दावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्त्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी केला. राजापुरातील कुंभवडे येथील श्री गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची सात एकाश्मस्तंभ स्मारके लळीत यांनी शोधली असून, ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत. इ. स. पू. १५०० ते ४०० वर्षे हा महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ मानला जात असून, हा मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा कालखंड आहे. या संशोधनाने एकाश्मस्तंभ स्मारकांद्वारे कोकणच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत पडण्यास मदत होणार आहे. पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे (इंडियन स्क्लप्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल, आय-एसएआरसी) येथे पाचवे राष्ट्रीय अधिवेशनात लळीत यांनी एकाश्मस्तंभ स्मारक संशोधनाचा आपला शोधनिबंध सादर केला.
कोकणचा प्रागैतिहास अद्याप अशात असून, सुसरोंडी (गुहागर) आणि कोळोशी (कणकवली) येथील मानवी वसतिस्थाने असलेल्या गुहा या दोन अतिप्राचीन काळातील संदर्भाशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते. काही वर्षांपूर्वी मध्याश्मयुगाच्या शेवटच्या व नवाश्मयुगाच्या काळातील कातळशिल्पे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे. त्यानंतर, राजापुरातील कुंभवडे येथे महापाषाण काळातील एकाश्मस्तंभ आढळल्याची माहिती लळीत यांनी दिली. कोकणात एकाश्मस्तंभ आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.
कुंभवडे येथे आढळलेले सात एकाश्मस्तंभ श्री गंभीरेश्वर मंदिर परिसरात तीन गटांत विभागलेले आहेत. सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून, दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरून नाणारफाटा-कुंभवडे-उपळे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराकडे वळणाऱ्या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून, दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तीनशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजूला सुमारे तीनशे मीटर अंतरांवर असलेल्या एका मळ्यात एकूण चार पाषाणस्तंभ पाहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे. या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असून तीन उभ्या स्थितीत आहेत.
एकाश्मस्तंभ म्हणजे काय? – एकाश्मस्तंभांना इंग्रजीत मेनहिर असे म्हटले जाते. ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले पाषाण होय. महापाषाणकालीन संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींचे दफन केल्यावर त्यांचे स्मारक म्हणून एकाश्मस्तंभ उभे केले जात असत.
अभ्यासात महत्त्वाचा दुवा – महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समूहांच्या, तत्कालीन संस्कृतींच्या चालीरिती, श्रद्धा, उपासना पद्धती यांच्या अभ्यासात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यांचे शासनाने जतन अन् संवर्धन करताना ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत लळीत यानी मांडले.
असे आहेत एकाश्मस्तंभ – स्थानिक जांभ्या दगडांमधून खोदलेले. उभ्या सर्व पाषाणस्तंभांची दिशा पूर्व-पश्चिम लहानाची उंची २.५ फूट, रूंदी २ फूट व जाडी ५ इंच. मोठ्याची उंची ८ फूट, रूंदी ३ फूट व जाडी १० इंच