गेल्या अडीच वर्षात आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघात अडीच हजार कोटी रुपयांची कामे आणली. विकासकामांचे खोके पाठवण्याचं काम आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादांनी केलं. मात्र भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी दापोली येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या सभेत बोलताना केला. गुरुवारी आमदार योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी झालेल्या सभेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते अजय बिरवटकर, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नगरसेविका साधना बोत्रे, तसेच आरपीआय आठवले गटाचे जिल्ह्याचे पदाधिकारी प्रीतम रुके आदी उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांनी माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यावरही कडाडून टीका केली.
त्यांनी ५ वर्षात काहीच काम केले नाही असे सांगताना केवळ लोकांची घरे फोडायची, वाडी फोडायची ऐवढेच काम यांनी केले असे रामदासभाई संजय कदम यांचे नाव न घेता म्हणाले. या उलट गेल्या पाच वर्षात योगेश कदमांनी अडीच हजार कोटी रुपये या मतदार संघात आणले आणि विकास काय असतो ते दाखवून दिले यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची नावे घेत त्यांचे आभार मानावे इतके कमी आहेत. योगेशने जी काम पाच वर्षात मागितली ती विकासाचा खोके देणारी काम या सरकारने केली अशा शब्दात रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपला विजय हा ४० ते ५० हजारच्या फरकाने होईल हे निश्चित आहे असे सांगत आजची उपस्थिती बघता विजयाच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल आहे यापुढची प्रत्येक पाऊल ही अशीच असतील की आता विरोधकांना यापुढे आपल्यासमोर निवडणुकीत उभ राहण्याचीही हिंमत होणार नाही असे असा आक्रमक पवित्रा घेत योगेश कदम यांनीही सभा गाजवली.