किल्ले राजकोट येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते म्हणाले, “पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच ”शिवसृष्टी” उभारणीचे कामही सुरू होईल. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवून वर्षानुवर्षे हा पुतळा दिमाखात उभा राहावा, या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे जो डाग आमच्या जिल्ह्यावर लागला आहे तो येणाऱ्या कालावधीमध्ये पुसला जाईल.”श्री. राणे म्हणाले, “पुतळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष आहे. यासाठी अनेक बैठका मंत्रालयस्तरावर घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याच नेत्वृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी राज्य नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी या पुतळा उभारणीबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. याबाबतचे सविस्तर सादरीकरणही ते लवकरच घेणार आहेत.”ते म्हणाले, “हा पुतळा जगविख्यात ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार घडविणार आहेत.
गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा भव्य पुतळा देखील त्यांनी बनविलेला आहे. पुतळा उभारणीमध्ये शासन कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. आमदार नीलेश राणे यांनी किल्ल्याची सुरक्षितता, तटबंदी तसेच या भागाच्या विकासासाठी केलेल्या सूचनांची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ. आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार पुतळ्याच्या बाजूला ‘शिवसृष्टी’ उभी केली तर पुतळा पाहण्यासाठी येणाऱ्यांना शिवरायांचा इतिहास अधिक माहिती होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेत आहे. संबंधित जमीन मालकांसोबतही चर्चा सुरू आहे. पुतळा उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच “शिवसृष्टी” उभी करण्याचे कामही सुरू होईल.”देशाचे नेते म्हणवणाऱ्या राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टनंतर तुम्ही राहुल गांधी यांना महाराष्ट्राच्या भूमीत पाय ठेवायला देणार का ? शिवरायांच्या नावाने त्यांनी फक्त राजकारण केले. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी पालकमंत्री राणे यांनी केली.
असा आहे पुतळा – सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. आजमितीस पुतळ्याच्या १० फूट उंचीच्या चौथरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट असून, संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टीलची सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे. तसेच चौथऱ्यासाठी एम ५० या उच्च दर्जाचे काँक्रिट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याची संकल्पना ‘आयआयटी मुंबई’कडून तपासून घेण्यात येत असल्याचेही अभियंता किणी यांनी सांगितले.