रत्नागिरी नगर परिषदेने पालिकेने अचानक कंत्राटी कर्मचारी कपात केल्याचा मोठा परिणाम शहरातील कचरा वाहतुकीवर झाला आहे. कचरा संकलनाचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. सकाळी ७.३० ते ८ वाजेपर्यंत येणाऱ्या घंटागाड्या आता ११.३० वा. नंतर येतात. त्यामुळे १० वाजता जाणाऱ्या नोकरदार वर्गाने कचरा कधी टाकायचा, असा प्रश्न उपस्थित केला. गणेशोत्सव जवळ आला असून शहरात रस्त्यांना खड्डे आहे, ते लवकरात लवकर भरा, अशा अनेक प्रश्नासाठी शिवसेना (शिंदे गट) मंगळवारी पालिकेवर धडकली. आक्रमक होऊन मुख्याधिकाऱ्यांवर त्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्व विभागांची लवकरच बैठक लावू, असे आश्वासन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
५५ कर्मचाऱ्यांना कमी केले – रत्नागिरी नगरपालिका आर्थिक संकटात आल्यामुळे काही दिवसांपूर्वी अचानक ५५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले. याचा परिणाम थेट शहरातील कचरा गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला आहे. हे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. प्रत्येक प्रभागामध्ये एक गाडी आहे. कर्मचारी कपातीमुळे ६ घंटागाड्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रभागामध्ये सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान येणारी घंटागाडी कर्मचारी कपातीमुळे ११.३० वा. नंतर येऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात महिला, पुरूष नोकरदार वर्ग आहे. १० वाजता हे कामावर जातात. त्यानंतर जर कचरा गाडी आली तर कचरा कोण टाकणार, असा अनेक प्रश्न आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वी प्रमाणे ठरलेल्या वेळेत सर्वत्र घंटा गाड्या सुरू कराव्या, अशी मागणी शिवसेनेने केली.
जाब विचारला – शहरातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत, ते देखील गणेशोत्सवापूर्वी भरण्यात यावेत, अशा सूचना केल्या. शिळ धरणावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. एक्सप्रेस फिडरवरील वीजपुरवठा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वारंवार खंडित होतो. तो वीज पुरवठा सुरळीत व्हावा, याठी प्रयत्न करा. जेणेकरून नागरिकांची पाण्याची गैरसोय होणार नाही, अशा विविध प्रश्नांवर शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख राजन शेटे, महिला शहर संघटक स्मितलताई पावसकर यांच्या नेतृत्वाखाली निमेश नायर, दीपक पवार, संजय हळदणकर, बंटी कीर, राकेश नागवेकर, अभिजीत दुडे, सौरभमुलुष्ट, मनोज साळवी, मनीषा बामणे, हेमंत जाधव व इतर शिवसैनिक यांनी माननीय मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा, अशी भूमिका स्पष्ट केली.