पावसाळी अधिवेशनात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना डिवचलं. या घोषणेनं वैतागलेल्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात व्यंगचित्राचा बॅनर झळकावून हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून शिंदे गटाने केलेल्या गद्दारीचा चांगलाच समाचार घेतला आहे.
शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. पूर्वी अशा उपाध्या तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे लावल्या जात असत. अगदी सोप्या भाषेत हा विषय सांगायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले गेले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का आजन्म पुसता येणे कठीण आहे.
आपण केलेल्या कृत्याची सल कायमच मनात टोचत राहणार असल्यामुळेच, दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत” असं म्हणत सामनातून शिवसेनेनं बंडखोरांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं बंडखोर आमदारांवर टीका करताना थेट ‘बोको हराम’ या संघटनेचा उल्लेख करत शिंदे गटाच बारसं केलं आहे.
“महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. गद्दारांचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा एक प्रकारे कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे अस म्हटल्यास वावग ठरणार नाही.