राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने दि. २२ एप्रिल रोजी बारसू परिसरात जमाव बंदी लागू करुन ४५ आंदोलकांना तालुका, जिल्हा बंदी केली होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तात बारसू सड्यावर माती परीक्षण सुरू केले. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाचा आदेश झुगारून माती परीक्षणाला विरोध केला. स्थानिकांचा विरोध मोडीत काढून प्रशासनाने माती परीक्षण पूर्ण केले.
आंदोलकांचा इशारा – दडपशाही करुन रिफायनरी प्रकल्प माती परीक्षण केले म्हणजे रिफायनरी प्रकल्प झाला असे शासनाने समजू नये. आम्ही अजून जिवंत आहोत.. आम्ही जिवंत असे पर्यंत रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. शासनाने दडपशाही करुन आम्हाला या माळरानावर उन्हात तडफवल त्याचा निषेध करण्यासाठी बारसू सड्यावर जमलो आहोत. कोकणाला .लाभलेले नैसर्गिक वैभव उध्दवस्त करण्या पेक्षा पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास करावा. रोजगार निर्मितीच्या नावाखाली कोकण उध्दवस्त करण्याचा डाव शासन आखत आहे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
बोंबा आणि श्राद्ध – शनिवार दि. २७ रोजी दुपारी बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना यांच्या वतीने बारसू सड्यावर आंदोलक एकत्र आले. एकच जिद्द रिफायनरी रद्द अशा घोषणा देत. शासनाने रिफायनरी प्रकल्प माती परीक्षण करण्यासाठी ज्या पध्दतीने दडपशाही अवलंबली त्याचा निषेध केला. प्रशासनाने ज्या ठिकाणी बोअरवेल खोदली त्या ठिकाणी एका फुट्यावर सरकार अस लिहून पिंड घातलं. शासनाच्या नावाने बोंबा मारत शासनाच्या नावाने श्राद्ध घातले. अनेक आंदोलकांनी मुंडन करुन घेतलं.
रिफायनरी विरोधावर ठाम – बारसू -सोलगाव प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध मोडीत काढून प्रशासनाने माती परीक्षण काम पूर्ण केले. स्थानिक जनतेशी संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र, त्याला स्थानिकांनी प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधूर नळकांड्या फोडल्या तसेच दिसेल त्याला प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून सुध्दा आंदोलकांनी प्रभात फेऱ्या काढून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण केले. प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात रिफायनरी माती परीक्षण पूर्ण केले. तरीही शनिवारी बारसू सड्यावर शासनाचे श्राद्ध घालून पाठीवर एकच जिद्द रिफायनरी रद्द हे घोष वाक्य काळ्या शाईने लिहून आपल्या रिफायनरी विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.