कोकण आणि कोकणातील सौंदर्य म्हणजे अगदी जनमानसाला भुरळ पाडणारे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणाचे कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला असेलच. त्यामुळे कोकणातील नेमकी अशी कोणकोणती ठिकाणे आहेत जी प्रसिद्ध तर आहेतच परंतु, प्रत्येक पर्यटकाने तेथे आवर्जून भेट द्यावी असे आपल्याला वाटते.
आज आपण आंजणारी गावामध्ये असणाऱ्या जागृत देवस्थान श्री दत्तगुरुंचे देवस्थान बद्दल माहिती पाहणार आहोत. आंजणारी नदीच्या काठावर वसलेले हे दत्तगुरूंचे मंदिर अतिशय विलोभनीय आहे. याच मंदिराची ख्याती अशी आहे कि, या देवस्थानाला “प्रति नृसिंहवाडी क्षेत्र” असे देखील म्हणतात. जसे नृसिंहवाडी येथील देवस्थान आहे त्याचप्रमाणे, येथील मंदिराची सुद्धा रचना केलेली आहे. नृसिंहवाडी येथे जस नदी काठी मंदिर वसलेले आहे त्याप्रमाणेच आंजणारी येथील दत्तगुरू मंदिर आहे. फक्त फरक एवढाच कि, जी गर्दी, भाविकांची वर्दळ नृसिंहवाडी मंदिरामध्ये दिसून येते त्याप्रकारे वर्दळ अथवा पर्यटकांची गर्दी इथे दिसून येत नाही. त्यामुळे शांत निरभ्र वातावरणात ध्यानधारणा करण्यासाठी एकदम उत्कृष्ट जागा म्हणजे हे दत्तमंदिर आहे.
रत्नागिरीतून या स्थळी जायचे असेल तर साधारण दीड तासाचा अवधी लागतो. हातखंबा तिठ्यावरून लांज्याच्या दिशेने जाताना आंजणारी पुलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक कमान लागते तिथून साधारण दीड किमी अंतरावर आतमध्ये हे विलोभनीय परिसरामध्ये वसलेले दत्तगुरूंचे देवस्थान आहे. रस्ता संपूर्ण निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून, पावसाळ्यामध्ये तर हा हिरवागार निसर्ग पाहून तिथून परतण्याची देखील इच्छा होणार नाही. चहुबाजूला असलेली विविध प्रकारच्या झाडांची हिरवळ पाहून मनाला एक प्रकारची शांतता लाभते.
प्रसिद्ध खोरनिनको धरण सुद्धा याच मार्गावर आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर लांजा दाभोळ रोडला वळल्यावर कोरले फाटा लागतो. तिथून अंदाजे १० किमी अंतरावर भांबेडमार्गे उजवीकडे गेल्यावर प्रभानवल्लीवरून डावीकडे वळल्यावर खोरनिनको धरणाकडे जायला रस्ता आहे. रस्त्याच्ये दुतर्फा शेती आणि विविध प्रकारच्या झाडांची लागवड केलेली दिसून येत आहे. गावाच्या कमानीतून आता मध्ये गेल्यावर डावीकडे धरणाचा काही अंश दृष्टीस पडतो. तिथे जाण्यासाठी २ रस्ते असून एक पक्का आणि एक पायवाट अशा प्रकारचे आहेत. वाहन सुद्धा पार्किंगसाठी पुलाखाली जागा उपलब्ध आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात काही अविस्मरणीय काळ घालवायचा असेल तर पायवाटेने जाऊन या धरणाला अवश्य भेट द्या.
५ ते १० मिनिटाच्या पायवाटेने डोंगर चढून गेला कि जे दृश्य दिसते ते अवर्णनीय आहे. हिरवागार डोंगरांचा परिसर, खाली उतरलेले ढग आणि धरणाचे शांत वाहणारे पाणी हे समीकरणच अफलातून आहे. आणि शेवटला उरते ती पाण्यामध्ये करायची मजामस्ती, मग तिथून पाय निघणे कठीणच बनते. दिवसातील कोणत्याही वेळी गेलात तरी समोरचे निसर्गाचे सौंदर्य हे विहंगमच असते. त्यामुळे अशा नवीन ठिकाणाचा शोध घेत कोकण भ्रमंती जरूर करायला या.
स्वयंभू आंजणारी दत्तगुरू देवस्थानला जाण्याचा मार्ग-
हातखंबा तिठा – मुंबई-गोवा हायवे – आंजणारी पूल – दीड किमी अंतरावर आतमध्ये देवस्थान
खोरनिनको धरणाकडे जाण्याचा मार्ग –
दत्तगुरू देवस्थानातून बाहेर पडल्यावर – कोरले फाटा – भांबेड मार्ग – प्रभानवल्ली फाटा- डावीकडे खोरनिनको धरण