राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरूनच एसटी कर्मचारी पवारांच्या घरावर हल्ला करत जमावाने धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येतो आहे. त्यानुसार सदावर्ते यांना अटक करण्यात आली. इतकंच नाही तर पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे नागपूर कनेक्शनही असल्याचे सांगितलं जात आहे.
तेच नागपूर कनेक्शन आता अखेर समोर आलं आहे. नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी या सर्व प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. नागपूर येथील संदीप गोडबोले या एसटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा एसटी कर्मचारी यांत्रिक पदावर कार्यरत आहे. पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोडबोले हा सदावर्ते यांच्या सतत संपर्कात होता, असा दावा केला जात आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी गोडबोले याला ताब्यात घेतलं आहे.
पवार यांच्या घरी हल्ला करण्याआधी सदवार्तेंच्या घरी एक बैठक झाली होती, नागपुरातूनही एक कॉल आला होता. पण नागपुरातून नेमका कोणाचा फोन आला होता याचा तपास सुरु आहे. फोन संदर्भात आरोपी कोणतीही माहिती देत नाही आहेत. असा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर सदावर्ते यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपये घेतले होते, आजपर्यंत एवढ्या हजारो कर्मचारीवर्गाकडून सदावर्ते यांनी दीड कोटी गोळा केले, असेही सांगण्यात आले आहे.
दिनांक ११ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी गुणरत्न सदावर्ते यांची कोठडी मागताना काही महत्त्वाच्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आणून दिल्या होत्या. तपासाला गुणरत्न सदावर्ते सहकार्य करत नाहीत, त्यामुळे ११ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.