आता वीज सेवा देखील मोबाईल सेवे प्रमाणे प्रीपेड व पोस्टपेड होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येकाच्या घरी जुने वीज मीटर हटवून स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. यात प्रीपेड मीटरमध्ये पैसे संपले की वीज पुरवठा खंडित केला जाईल. रिचार्ज केल्यावर परत वीज सेवा सुरळीत होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शहरातून हे नवे स्मार्ट मीटर बसवले जाणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिली आहे. या मीटर मध्ये सिमकार्ड असणार आहे व याद्वारे सर्व माहिती मह्नितरणच्या सर्व्हरला मिळणार आहे. जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याच्या प्रक्रियेत कोणताही अतिरिक्त भार ग्राहकांवर लादला जाणार नाही आहे.
एका अॅपवर वीज वापराबाबत सर्व माहिती ग्राहकांना मिळणार आहे. आजवर किती वापर झाला? किती वीजभार आहे? किती पैसे शिल्लक आहेत याची सर्व माहिती या अॅपद्वारे ग्राहकाला मिळणार आहे. विजेचा काटकसरीने वापर करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते असे बोलले जात महावितरणने यासाठी २६ कोटी रुपयांच्या ६ निविदा वितरित केल्या असून अदानी पॉवरसह चार कंपन्यांना एलओए (लेटर ऑफ क्सेप्टन्स) अर्थात स्वीकारपत्र जारी करण्यात आले आहे. आता या कंपन्यांना एकूण २७ महिन्यांत राज्यभरातील २.३७ कोटी ग्राहकांचे मीटर बदलवून प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागतील. येत्या १० वर्षांपर्यंत मीटरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याच कंपन्यांची राहील.