मुंबई-गोवाराष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात गतवर्षी पावसाळा संपता संपता कोसळलेली संरक्षक भिंत आणि मातीचा भराव गेले दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात वाहून पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील शेतीत घुसला आहे. या भागातील शेतीसह सर्वत्र चिखल साचला असून पाणकरवाडीतील विहीर आणि रेल्वे ट्रॅकवरील मोरीही गाळाने भरली आहे. गावकऱ्यांसह महसूल कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. गतवर्षी पावसाला प्रारंभ झाल्यानंतर २७ जूनला परशुराम घाटात संरक्षक भिंतीसह मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर पाऊस जाता जाता ऑक्टोबर महिन्यात पुन्हा घाटात ४० मीटर लांबीची भिंत कोसळली. शिवाय तेथील मातीचा भरावही वाहून गेला. घाट धोकादायक बनल्याने तेथील मार्गिका बंद करून पर्यायी वाहतूक दुसऱ्या मार्गिकेवर वळवण्यात आली. त्यानंतर तेथील धोकादायक वाटत असलेल्या भिंती पाहून तेथे सध्या गॅबियन भिंत उभारण्यात येत आहे.
मात्र घाटाच्यादृष्टीने वरवर उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी कोसळलेली भिंत, मातीचा भराव हा घाटातील दरीत अर्ध्यावरच जाऊन थांबला. भिंत कोसळल्यानंतर पुढे तितकासा मोठा पाऊस पडलेला नसल्याने मलबा हा अर्ध्यावरच अडकून राहिला. तो उचलण्यासारखी परिस्थिती नसल्याने त्याकडे कुणाचे लक्षही नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सुरवातीलाच नवीन समस्या पेढेतील शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी यापूर्वी कोसळलेल्या आठवडाभराच्या मुसळधार पावसात मातीचा भराव घाटातील दरीतून वाहून थेट पायथ्याशी वसलेल्या पेढे-पाणकरवाडीतील शेतात गेला. तेथील एक विहीरही गाळाने भरली आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरील मोरी या गाळाने काठोकाठ भरली आहे.
हा गाळ तेथून न काढल्यास पाणी जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने येणाऱ्या पावसात ट्रॅकवरून पाणी जाण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे वाहून आलेला गाळ हा तेथील शेतीत गेल्याने दहा ते पंधरा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना महामार्गकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान, नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर महसूल कर्मचारी विजया मिटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली आहे. या पाहाणीदरम्यान सरपंच आरूषी शिंदे, उपसरपंच निशा माळी, अष्टविनायक टेरवकर, रूपेश शिंदे, संतोष पाणकर, राष्ट्रीय महामार्ग उपविभागचे अधिकारी महाडकर आणि सहकारी तुषार मोरे व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.