महिन्याभरापासून राज्यव्यापी सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपाबद्दल आज सुनावणी होणार असून, अनेक कर्मचारी मुंबईला आझाद मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आणि विशेष करून विलनीकरणाच्या मागणीसाठी अद्याप संपावर ठाम आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधाप्रमाणे डीए, घरभाडे भत्ता आणि वेतन श्रेणी लागू करण्यात यावी इत्यादी मागण्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आल्या होत्या. त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार संघटनांमध्ये चर्चा देखील झाली. यावेळी कामगारांना घरभाडे आणि महागाई भत्ता तसेच मूळ वेतनात वाढ देण्याचं मान्य करण्यात आले.
मात्र, त्यानंतरही संप सुरूच राहिला. उच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारून सुद्धा अनेक कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे आज उच्च न्यायालयासमोर होणार्या सुनावणी संदर्भात अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने नोव्हेंबर पासून पुकारलेला संप अद्याप सुरूच आहे. उच्च न्यायालयाने एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश देऊन प्राथमिक अहवाल २० डिसेंबर रोजी मागितला होता. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये २० तारखेला विलीनीकरणच होईल अशा अफवा पसरवल्याने, शेकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने आझाद मैदानावर रवाना झाले असून, सोमवारी उच्च न्यायालय संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा टिकून आहेत.
संपकऱ्यांनी २० डिसेंबर पर्यंत संप सुरूच ठेवावा, विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारी उच्च न्यायालयाच्या सुनावणीतून विलीनीकरणाचाच निर्णय येईल, अशाप्रकारच्या पोस्ट संपकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांच्या ग्रुपवर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे अशा वेळी अनेक अफवांना ऊत येत असल्याने नक्की काय सुनावणी झाली याबाबत काही ठिकाणी गोंधळलेली परिस्थिती दिसून येत आहे.