25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriएसटीचे वेळापत्रक कोलमडले, निवडणुकीसह एकादशी यात्रेला गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल

एसटीचे वेळापत्रक कोलमडले, निवडणुकीसह एकादशी यात्रेला गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल

बसफेऱ्या उशिरा धावणे, ऐनवेळी फेऱ्या रद्द करणे असे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहेत.

कार्तिकी एकादशी व विधानसभा निवडणूक प्रशिक्षण या कारणांसाठी देवरूख आगारातील तब्बल २२ बसगाड्या आगाराबाहेर गेल्यामुळे आगाराचे एसटी बस वेळापत्रक कोलमडले. ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या अचानक रद्द कराव्या लागल्या. त्याचा फटका प्रवासी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला. त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रवाशांना तासन्तास ताटकळत एसटी बसची वाट पाहात बसावे लागले. एसटी प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराबद्दल प्रवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया ऐकावयास मिळत होत्या. देवरूख आगाराला ८० बसगाड्यांची गरज असताना त्यांच्याकडे ७० बसगाड्या उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांशी बसगाड्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. आगारातून काल १६ बसगाड्या कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरला सोडण्यात आल्या तर सहा गाड्या निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी सोडण्यात आल्याचे स्थानकातून सांगण्यात आले.

पंढरपूरला जाणाऱ्या बसगाड्या रिकाम्या धावताना दिसत होत्या. प्रवासी नसतील तर बसगाडी का सोडली जाते, हे न उलगडणारे कोडे आहे. या ढिसाळ नियोजनाचा परिणाम एसटीच्या स्थानिक वेळापत्रकावर होत असून, बसफेऱ्या उशिरा धावणे, ऐनवेळी फेऱ्या रद्द करणे असे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना होत असून प्रशासनही हतबलतेने प्रवाशांना मिळेल त्या बसने पुढे जा, असा सल्ला दिला जात आहे. सध्या दिवाळीची सुटी संपल्याने आपल्या गावी परत जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. महिलांना व वृद्ध प्रवाशांना बसमध्ये एसटी तिकिटात पन्नास टक्के सवलत मिळत असल्याने प्रवासी एसटी प्रवासाला पसंती देत आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे.

नाईलाजाने प्रवाशांना एसटीचा आसरा घ्यावा लागतो. ज्या गाड्या उपलब्ध होत आहेत त्या गाड्यांना प्रचंड गर्दी होते. लोकांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांमध्ये काहीवेळा वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद मिरवणाऱ्या प्रशासनाने पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

देवरुख स्थानकातील आसनव्यवस्था अपुरी – देवरूख स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठीची आसनव्यवस्था पुरेशी नाही. काही खुर्चा गायब झाल्या आहेत. संगमेश्वर स्थानक बांधणीचे काम सध्या बंद आहे. तिथेही आसन व्यवस्था पुरेशी नाही.

देवरूख-संगमेश्वर-बेळगाव बसफेरी सुरू – देवरूख आगाराने कोल्हापूर, निपाणी, बेळगाव परिसरातील प्रवाशांसाठी संगमेश्वर इथून सकाळी सहा वाजता संगमेश्वर-बेळगाव ही एसटी बसफेरी सुरू केली आहे. ही फेरी बेळगावला दुपारी दोन वाजता पोहचते. बेळगाव इथून दुपारी अडीच वाजता देवरूखच्या दिशेने प्रयाण करते. रात्री दहा वाजता ही फेरी देवरूखला पोहोचते. या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांनी या बसफेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रक संगमेश्वर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular