रत्नागिरी एस.टी. बसस्थानकाचे नवीन बांधकाम गेल्या दोन-अडीच वर्षापासून काही न काही अडचणींमुळे रखडले आहे. त्यामुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात फरफट होताना दिसत आहे. वाहतुकीचे बदललेले स्थानक त्यामुळे, प्रवाशांच्या मनातील नाराजी विचारात घेऊन २ ऑगष्ट रोजी महाराष्ट्र समविचारी मंचने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बसस्थानकासमोर थाळीनाद आंदोलन केले होते. त्यामुळे महाराष्ट्र समविचारी मंचच्या थाळीनाद आंदोलनाला यश आले असून हायटेक बसस्थानकाच्या कामाचा अखेर श्रीगणेशा झाला असल्याचे एस.टी.विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळामध्ये एस.टी.च्या फेर्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने, आर्थिक उत्पन्न काहीच नसल्याने ठेकेदाराला रक्कम देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता काही प्रमाणामध्ये रक्कम देऊन, मुदत वाढवून घेण्यात आली आहे. मध्यंतरी आर्थिक अडचणीतून ठेकेदाराला पैसे देण्यात आलेले नव्हते हे सांगून यापुढे या कामात खंड पडणार नसल्याची ग्वाही देखील एस.टी प्रशासनाने दिली आहे.
समविचारी मंचाने केलेले थाळीनाद आंदोलन राज्यभर गाजले होते. स्थानिक वृत्तपत्रांसहसह सर्व पत्रकारांनी या आंदोलनाचे यथोचीत स्वागत केले होते. समविचारीच्या प्रयत्नांने हायटेक बसस्थानकाचे गेली काही वर्षे रखडलेले काम सुरु झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, केशवजी भट, मनोहर गुरव या सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर यापुढील जनतेच्या प्रश्नावर समविचारीच्या आंदोलनात निपक्ष भावनेने सहभागी होण्याची ग्वाही देखील दिली असल्याचे समविचारीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीच्या सौदर्यामध्ये भर पडणार असून, रत्नागीरीवासियाना हायटेक बसस्थानकाचा लाभ घेता येणार आहे.