एस टी कामगारांचा बेमुदत सुरु असलेला संप संपुष्टात येण्याचे चिन्ह दिसत नसल्याने, आता एस टी महामंडळाने नविन पर्याय शोधून काढला आहे. एस टी सेवा पुन्हा पूर्ववत व्हावी, यासाठी यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांचा संप काळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतच्या निर्णयाच्या परिपत्रकामध्ये म्हटलंय की, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचा-यांनी बेकायदा संप पुकारला आहे, त्यामध्ये मुख्यत्वे चालक व वाहक यांचा समावेश असल्याने गाड्यांच्या फेऱ्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये सूरु आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वाहने चालनात आणण्याकरीता विविध उपाययोजना अमलात आणण्यासाठी संबंधित उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमवेत सर्व अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चे अंती यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरिक्षक यांना उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर संपकाळात ‘चालक’ तसेच वाहतूक नियंत्रकांचा ‘वाहक’ म्हणून वापर करण्याबाबत निर्णय झाला आहे.
पुढे म्हटलंय की, या निर्णयानुसार, संप कालावधीमध्ये प्रथम टप्यात चालक पदातून ज्यांना “वाहन परीक्षक” व “सहायक वाहतूक निरीक्षक’ पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. अशा कर्मचा-यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन, त्यांचा वापर प्रवासी वाहनांवर “चालक म्हणून करण्यात यावा, व त्यांच्याकडे प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला असल्याची खात्री करण्यात यावी अशी माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे काही दिवसांमध्येच एसटी ची वाहतूक सुरळीत होईल असे दिसून येत आहे. एसटी बंद असल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागाचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून आले आहे. शाळा सुरु झाल्या असल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा वाहतुकीसाठी खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.