कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी किंवा संस्थांना दिले जाणारे २०२० ते २०२२ या वर्षातील राज्यस्तरीय पुरस्कार शासनाने आज जाहीर केले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहा शेतक-यांचा समावेश आहे. आंबा-काजूसह शेतीमध्ये विविध प्रयोग केल्यामुळे या शेतकऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे. शासनाकडून जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये २०२१ या वर्षातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दापोली तालुक्यातील कुडावळे येथील शेतकरी विनायक श्रीकृष्ण महाजन यांना जाहीर झाला आहे. याच वर्षातील युवा शेतकरी पुरस्कार कुंभवे-साकळोलीतील अनिल हरिश्चंद्र शिगवण (ता. दापोली) तर सर्वसाधारण गटातून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार हेमंत यशेश्वर फाटक (मु. चिंचखरी, ता. जि. रत्नागिरी) यांना देण्यात येणार आहे.
२०२२ या वर्षातील युवा शेतकरी पुरस्कार लांजा येथील मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना, उद्यानपंडीत पुरस्कार डोर्लेतील अजय तेंडुलकर (ता. रत्नागिरी), सर्वसाधारण गटातील वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार संतोष शांताराम वाघे (ता. निर्व्हळ, ता. चिपळूण) यांना दिला जाणार आहे. हेमंत फाटक यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भात पिकामध्ये सेंद्रीय निविष्ठांचा वापर करून चांगले उत्पादन घेतले आहे. तसेच आसपासच्या शेतक-यांना मार्गदर्शन दिले आहे.
डोर्लेतील अजय तेंडुलकर शेतात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ प्रमुख पिके व कोकम, रामफळ, फणस ही जोडपिके पिके घेतात. कोकण कृषि विद्यापीठ दापोली येथून इस्राईल पद्धतीचे आंबा लागवड तंत्रज्ञान माहिती घेऊन सघन आंबा लागवड केली आहे. नारळ पिकामध्ये मसाला पीक उत्पादन घेतले. संतोष वाघे यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भात लागवड करून चांगले उत्पादन घेतात. तसेच खेकडा पालन, मत्स्यपालन हे शेतीपूरक उपक्रम राबवत आहेत. अनिल शिवगण हे भात लागवडीत चारसुत्री व एसआरटी पद्धतीचा यशस्वी वापर करत आले आहेत. शेतीबरोबरच पशुपालन हा पुरक व्यावसायही करत आहेत.