उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच पुलाच्या काम ातील सुमारे २० किलो वजनाची लोखंडी सळी थेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातावर पडल्याने तो जखमी झाला. त्यामुळे त्याचे सहकारी विद्यार्थी आक्रमक झाले तर शहरात ही माहिती समजताच युवासेना तसेच मनसेचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला आणि संतप्त जमावाने चक्क महामार्ग रोखून ठेवला. जोपर्यंत ठेकेदार येत नाही तो पर्यंत महामार्ग सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत जमावाने महाम ार्गावर ठाण मांडले होते. दरम्यान त्याठिकाणी आलेल्या ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला घेराव घालून जमावाने चांगलेच धारेवर धरले. अखेर पोलीस व महामार्ग अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक खुली करण्यात आली. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
उड्डाणपुलाचे काम – महामार्गाचे काम तसेच चिपळूण येथील उड्डाणपूल नेहमीच वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आणि वादग्रस्त ठरले आहे. वर्षभरापूर्वीच उड्डाणपुलाचे गर्डर कोसळले होते. तर काम सुरू असताना पिलरवरून दोन कामगार पडून जखमी झाले होते. तसेच एका ट्रकमध्ये कामाची लोखंडी सळी अडकून अपघातदेखील झाला होता. सोमवारी सकाळीच एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ येऊन ठेपली होती.
लोखंडी सळी कोसळली – चिपळूण येथील डीबीजे कॉलेज समोर उड्डाणपुलाच्या पिलरचे काम सुरू असतानाच सुमारे २० किलो वजनाची लोखंडी सळी खाली पडली. त्याचवेळी सिद्धार्थ शिंदे हा कॉलेज तरुण रस्त्यावरून जात होता. त्याच्या थेट हातवरच लोखंडी सळी पडल्याने तो जखमी झाला. डीबीजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समोर हे पाहताच ते चांगलेच संतापले. त्यांनी सर्वप्रथम सिद्धार्थ शिंदेला हॉस्पिटलला दाखल करून उपचार केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरच संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
महामार्ग रोखला – दरम्यान ही घटना शिवसेनेच्या युवासैनिकांना समजताच तालुकाप्रमुख निहार कोळे यांच्यासह युवासैनिक व मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्यासह मनसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर शहरातील अनेक नागरिक देखील धावून आले आणि एक मोठा जमाव रस्त्यावर उतरला. जोपर्यंत संबंधित ठेकेदार येथे येत नाही आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत महामार्ग सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत जमावाने महामार्ग रोखून धरला. सहाजिकच महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीला घेराव – ठेकेदार कंपनीचा प्रतिनिधी येताच संतप्त जमावाने त्याला घेराव घालून अक्षरशः फैलावर घेतले होते. तो समाधानकारक उत्तर देत नसल्याने जमाव चांगलाच प्रक्षुब्ध झाला होता. मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत रोखठोक भाषेत ठेकेदार प्रतिनिधीला खडे बोल सुनावले.
अखेर वाहतूक सुरळीत – तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुढाकार घेत मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनीदेखील मध्यस्थी करत ठेकेदारांची चूक निदर्शनास आणून देत योग्य त्या सूचनादेखील दिल्या. तसेच जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च देण्याच्या सूचना देखील दिले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर जम ावाने समजूतदारपणा दाखवला आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती.