बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ वादग्रस्त ठरलेले गाण्यावर वृंदावनचे संत आणि मध्य प्रदेशातील सरकारच्या इशाऱ्यानंतर म्यूझिक लेबल सारेगामाने या वादग्रस्त गाण्याचे लिरिक्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मधुबन हे गाणे गायिका कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायलेले आहे. बॉलीवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
हे मूळ गाणे १९६० सालच्या कोहिनूर चित्रपटातील असून, जे मोहम्मद रफी यांनी गायले होते. त्याचे संगीत नौशाद यांचे होते तर शकील बंदौनी यांनी ते लिहिले होते. म्युझिक लेबल सारेगामाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका निवेदनाद्वारे लिहिले आहे की, नुकत्याच प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया आणि आपल्या देशवासियांच्या भावनांचा सन्मान राखत, आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि लिरिक्स बदलून टाकत आहोत. त्याबद्लीचे नवीन गाणे पुढील २ दिवसामध्ये सर्व प्लॅटफॉर्मवर घेतले जाईल. यासोबतच हेच बदललेले गाणे प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येईल असे निवेदन जारी केले आहे.
सनीचे हे गाणे २२ डिसेंबरला रिलीज झाले आहे. त्यावरून वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवून सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सरकारने या अभिनेत्रीवर देखील कारवाई करून या व्हिडिओ अल्बमवर बंदी घालण्यात यावी, नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असे म्हटले आहे. महाराज पुढे बोलताना म्हणाले कि, सनीने जर तिचे सीन हटवले नाही आणि देशवासीयांची माफी मागितली नाही तर तिला देशात राहू दिले जाणार नाही.
यापूर्वी गृहमंत्री मिश्रा यांनी देखील सनी लिओनीला माफी मागण्यास सांगितले होते. हिंदू देवतांचा अशा प्रकारे केला जाणारा अपमान सहन केला जाणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. याबबत राज्य सरकारने कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्यानुसार जर सनीने ३ दिवसांत माफी मागितली नाही आणि गाणे यूट्यूबवरून हटवले नाही, तर सनी आणि शरीब तोशी यांच्यावर एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात येईल.