माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. कणकवली येथील कार्यक्रमामध्ये बोलताना आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे, येथून पुढे आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगत, यापुढे केवळ पर्यावरणासाठी काम करणार असल्याचे प्रभू यांनी जाहीर केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी २०१४ सालामध्ये लोकसभा निवडणुक लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढविणार नाही. मात्र प्रत्येक माणसाशी संबधित असलेल्या पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कणकवलीतील मेळाव्यात त्यांनी असे म्ह्टले.
सर्वप्रथम राजकारणात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सद्य स्थितीमध्ये पुढे राजकारण विरहीत प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले आहे.
मी जेव्हा सीए पेशा सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी, आपल्या या निर्णयाला घरातल्यांनी प्रचंड विरोध केला. परतु, शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आपण राजकारणात आलो आणि खासदार झाल्याची आठवण प्रभू यांनी जागवली. प्रभू यांनी लोकसभेसाठी राजापूर मतदार संघातून त्यांनी सलग चारवेळा प्रतिनिधित्व केले होते. येथून पुढे आपण निवडणूक लढवणार नसून पर्यावरणासाठी काम करणार असल्याचे प्रभू यांनी जाहीर केले आहे.
हवामानात बदल होत असल्याने वादळांची संख्या वाढतेय. अवकाळी पाऊस वर्षभर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेला बदल कशामुळे होत आहे याबाबत सखोल माहिती घेणे गरजेचे आहे.