बारसू-सोलगांव पंचक्रोशीत पेट्रोकेमिकल प्रकल्पाच्या सोमवारी होणाऱ्या सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असून आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने २ हजार पोलिसांची फौज तयार ठेवली आहे. कितीही फौजफाटा तैनात केला तरी हे सर्वेक्षण आम्ही रोखूच, असे रिफायनरी विरोधी संघटनांनी स्पष्ट केले आहे.रिफायनरी विरोधी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंचक्रोशीतील ग्रामसभांनी रिफायनरी विरूद्ध तसेच रिफायनरी संदर्भातील कुठल्याही सर्वे क्षणाला मनाई करणारे ठराव केले आहेत. तरीही सोमवार दि. २४ एप्रिल रोजी सर्वेक्षण करण्याचा घाट सरकारने घातला आहे. सध्या कोकणात उष्णतेची तीव्र लाट आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही प्रकल्पाला विरोध करणारे आबालवृद्ध ग्रामस्थ एमआयडीसी व रिफायनरी कंपनीच्या पोलीस बंदोबस्तात आलेल्या पथकाला तीव्र विरोध करणार आहेत. पोलीस बळाचा वापर करून हा विरोध मोडून काढण्याची तयारी सरकारने ठेवली आहे, असा ‘आरोप संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनी केला.

कोकणाचे रासायनिक गटार होऊ नये म्हणून संघर्ष करणाऱ्या बारसू- सोलगांव ग्रामस्थांच्या या दिवशीच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनेने कोकणप्रेमी, पर्यावरणप्रेमी जनतेला, पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी जनतेला केले आहे. बारसू-सोलगांव पंचक्रोशीत येऊन स्थानिकांना साथ देण्यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन उभे राहण्याची विनंती करण्यात आली आहे.