राज्याच्या राजकारणात विशेष महत्व लाभलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकाचवेळी कोकणच्या दौऱ्यावर येत असून ६ मे रोजी दोघांच्याही जाहीर सभा कोकणात होणार आहेत. ६ मे रोजी उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये तर राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे. स्वाभाविकपणे या दोन्ही सभांकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने कोकणाच्या राजकारणात काही नव्या घडामोडी होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. कोकण म्हणजे शिवसेनेचा मजबूत गड मानला जातो. परंतु एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना पूर्ण दुभंगली. त्याचे हादरे कोकणात सर्वाधिक बसले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातून शिवसेनेचे काही आमदार शिंदे यांच्यासोबत गेले तर त्यांचे समर्थक व काही पदाधिकारी देखील त्यांच्या बरोबर गेले. साहजिकच ठाकरे गटाची ताकद कमी झाली. परंतु शिवसेना आणि ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आजही कोकणात आहे. हा वर्ग आपल्याकडे कायम रहावा तसेच सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात डॅमेजकंट्रोल करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून गेल्या महिन्यात ऐन शिमगोत्सवात खेड येथे जाहीर सभा घेऊन डॅमेजकंट्रोलचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे.

महाडमध्ये तोफ धडाडणार – आता ६ मे रोजी रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघात ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केले असून येथे देखील जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांना पक्षात घेऊन शिंदे गटाची साथ देणारे आमदार योगेश कदम यांना शह देण्याची तयारी करण्यात आली. त्याचप्रमाणे आता आमदार भरत गोगावले यांना शह देण्याची तयारी करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. या सभेत महाडचे माजी आमदार काँग्रेस नेते स्व. माणिकराव जगताप यांच्या सुकन्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

बंधूही कोकणात – खेड नंतर कोकणात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दुसऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आता त्यांचे बंधू राज ठाकरे देखील त्याचवेळी कोकणात येत असल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चे चा विषय बनला आहे.

राज ठाकरे ६ मे रोजी कोकणात – राज ठाकरे हे देखील ६ मे रोजी कोकणात येत असून रत्नागिरीच्या जवाहर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असल्याची महिती खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली आहे. कोकणात मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा यशस्वी करण्या संदर्भात बैठकही झाली आहे.

दोन्ही सभांकडे लक्ष – ठाकरे बंधूंच्या एकाच दिवशी कोकणात सभा होत असल्याने त्याविषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य आहे. हा योगायोग आहे की ठरवून घेतलेली भूमिका आहे याची चर्चा सुरू आहे. हे दोन्ही बंधू आपल्या भाषणात कोणाचा कसा समाचार घेतात याकडे लक्ष लागले आहे.