सोन्या-चांदीचे दागिने पॉलीश करुन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला नुकतीच अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. या टोळीतील एका आरोपीचा सोमवारी रात्री उशिरा कळंबणी रुग्णालयात अचानक मृत्यू ओढवला. या मृत्यूविषयी सशयाच वातावरण आहे. एकूण ५ आरोपींना पोलिसांनी पकडले होते. या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. खेड शहराजवळील भरणे येथे दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास एका ज्येष्ठ महिलेला तिच्या घरातील अंगणात उभ्या असताना एका अनोळखी इसमाने तुम्हाला सोने- चांदी पॉलिश करायची आहे का? मी तुम्हाला ते करून देतो, माझ्याकडे एक पावडर आहे असे सांगून तिला बेशुद्ध करून हात चलाखी करून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले होते.
या घटनेत ४ लाख ८० हजार इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगडया व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन संशयिताने पोबारा केला होता. फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. खेड पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यांच्या पथकामार्फत या गुन्ह्यामध्ये जुन्या प्राप्त माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून नाशिक मधील मनमाड येथून दि. २१ रोजी सोने पॉलिश टोळी ताब्यात घेतली.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८), साजिद लाडू साह (वय २४), मोहंमद आबिद इल्यास शेख (वय २९), महमद जुबेर फती आलंम शेख (वय ३२, सर्व राहणार तुळसिपुर, जमुनिया, जिल्हा भागलपुर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (वय ५० रा. मनमाड, शिवाजी चौक, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक) यांचा समावेश आहे. या संशयित आरोपीपैकी मोहंमद सुबेर इम्रान शेख (२८, तुळसिपुर, जमुनिया, जिल्हा भागलपुर, बिहार) याला पोलिस कोठडीत अस्वस्थ वाटू लागल्याने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याला उलट्या होत असल्याने कर्तव्यावर असलेले डॉक्टर एस. के. बळवंत यांनी प्राथमिक उपचार सुरू केले. परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मोहंमद शेख याचा मृतदेह शवविचछेदनासाठी कोल्हापूर येथे नेण्यात येणार असल्याचे डॉ. बळवंत यांनी सांगितले.