कोरोनाच्या संसर्गामुळं बहुचर्चित भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे. पाचवी कसोटी केव्हा खेळवली जाईल यासंदर्भात अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही. येत्या काही दिवसांमध्येच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे.
सौरव गांगुली या पार्श्वभूमीवर खासगी दौऱ्याच्या निमित्तानं इंग्लंडला रवाना होणार असून, गांगुली २२ किंवा २३ सप्टेंबरच्या दरम्यान इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे, इंग्लंड दौऱ्यावर गेल्यावर सौरव गांगुली इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन आणि इयान वाटमोर यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कसोटी कधी आयोजित करायची यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे इसीबीला होणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या नुकसानीबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. इसीबीला पाचवी कसोटी रद्द झाल्यानं प्रक्षेपणातून मिळणाऱ्या ३०० कोटी तर तिकिट विक्रीतून होणाऱ्या १०० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने इंग्लंड विरोधातील मालिकेत शानदार कामगिरी बजावली होती. टीम इंडियानं पहिल्या चार कसोटीमध्ये २-१ अशी आघाडी घेतली असून, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयाच्या अगदी जवळ पोहोचली होती. परंतु, अचानक पडलेल्या पावसाने पहिली कसोटी अनिर्णित राहिली. त्याचप्रमाणे, रवी शास्त्रींना कोरोनाची लागण झाल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला देखील कोरोनाची बाधा झालेली. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम अजून कडक केल्याने हॉटेल बाहेर जाण्यासही त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली, सर्व ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आल्याने, अखेर पाचवी कसोटी रद्द करण्यात आली.