परतलेला मान्सून माघारी आला कीं काय? अशी चर्चा सुरू असून येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात प्रामुख्यानं कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोकणापासून थेट गोव्यापर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील २४ तासांमध्ये पावसाची हजेरी असेल. तर, विदर्भआणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडं राहणार असून पहाटेच्या तापम ानात घट नोंदवण्यात येईल. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका असेल. तर, काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसाचं हे थरारनाट्य सुरू होईल असाही प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परतलेला मान्सून माघारी आलाय? – एकिकडे मान्सूनच्या परतीच्या चर्चा असतानाच दुसरीकडे पावसानं हजेरी लावणं म्हणजे नेमकं काय समजावं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असताना आता त्यामागची कारणंही समोर आली आहेत. अरबी समुद्राच्या आग्नेयेला लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकचा दक्षिण. भाग इथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार असून, त्यामुळं ही प्रणाली राज्यातील पावसास कारणीभूत ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. अरबी समुद्रातील ही प्रणाली सरत नाही, तोच बंगालच्या उपसागरांमध्येही नव्यानं कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्या कारणानं आता दिवाळीच्या आठवड्यात या प्रणालीमुळं पावसाच्या सरी बरसणार का? हाच चिंतातूर करणारा प्रश्न उभा राहत आहे.

