कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाली असून माजी आमदार सुभाष बने यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, रचना महाडीक आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. हा दुसरा टप्पा असून तिसरा टप्पा शिल्लक असल्याचे सांगून जिल्ह्यातील उरलेली उबाठा रिकामी करण्याचा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी बंडाळी उफाळली आहे. काही दिवसांपासूनच राज्यात ऑपरेशन टायगरला शिवसेनेने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता.
करेक्ट कार्यक्रम – आमदार निवडून दिले. राजापूरातून किरण सामंत, रत्नागिरीतून उदय सामंत, दापोली-खेडमधून योगेश कदम यांना भरभरुन यश मिळाले, असे देखील नामदार सामंत यांनी सांगितले.
काहींना पोटशूळ – यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले म्हणून काहींच्या पोटात पोटशूळ उठला आहे, अशी टीका पालकमंत्री सामंत यांनी केली आहे.
कोणी रोखणार नाही – आज मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताच पक्षाची ताकद वाढत चालली ‘आहे. आपण सर्वजण एकसंघ राहिलो तर कोणताही मायचा लाल रोखू शकणार नाही. ही ताकद आपण अशीच अबाधित ठेवूया, असे आवाहन नामदार उदय सामंत यांनी केले.
लाडक्या बहिणींना दिलासा – आपल्या भाषणात पालकमंत्री उदय सामंत यांनी तोंडभरून कौतुक केले. विरोधकांनी लाडकी बहिण योजना बंद करणार.. असे फेक नरेटीव्ह पसरविण्यास सुरुवात केली आहे. पण जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना दिला.