संगमेश्वर एसटी बसस्थानकाजवळ संगमेश्वर – देवरुख मार्गाच्या ठिकाणी असलेले ३ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली असून मोबाईल दुकान, आणि लगतची दोन अशा एकूण ३ दुकानांमध्ये चोरी झाली आहे. मोबाईलच्या दुकानातून किंमती हँडसेट लांबविणाऱ्या चोरट्याने लगतच्या दुकानांतील आईस्क्रीम फस्त केले असून शेजारच्या दुकानातील बिर्याणीवरही ताव मारल्याची चर्चा सुरू आहे. स्थानकात या चोरीविषयी संगमेश्वर पोलीस मोबाईल दुकानाचे मालक राजेश तुकाराम आंबवकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या असलेल्या म ोबाईल दुकानातील सुमारे ५१,४९९ रुपयांचा माल लंपास केला असून त्यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मध्यरात्री चोरी – संगमेश्वर बसस्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्गावरून देवरुखकडे जाणाऱ्या मार्गांवर असलेल्या साईराज कोल्ड्रिंक्स, राजेश आंबवकर यांचे दत्ता कृपा मोबाईल दुकान व अलिशान बिर्याणी हॉटेल अशा ३ दुकानांना अज्ञात चोरट्याने लक्ष्य करत ही तिन्ही दुकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर फोडून या तिन्ही दुकानात चोरट्याने डल्ला मारून पळ काढला. नेहमीप्रमाणे -दुकान मालक गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले त्यावेळी शटरला लावण्यात आलेले कुलूप उचकटून तोडून बाजूला फेकलेले दिसले. त्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानात चोरी झाली असा अंदाज बांधला आणि तो खराही ठरला.
सीसीटीव्हीत कैद – साईराज कोल्ड्रिंक्सचे मालक संदेश कापडी यांनी दुकानात प्रवेश करून सी. सी. फुटेज पाहिले असता चोरटा दुकानाच्या शटरचे कुलुप फोडताना व नंतर आत प्रवेश करताना दिसत असून चोरट्याने किरकोळ रकमेवर हात मारून बाहेर पडताना दोन आईस्क्रीम घेऊन दुकानातून बाहेर येऊन शटर बंद करतानाच्या पूर्ण हालचाली कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याचे त्यांना दिसून आले.
आईस्क्रीम खाल्ले – आईस्क्रीम खाऊन, मोबाईल दुकान फोडले असावे, असा कयास वर्तविण्यात येत आहे. कारण चोरट्याचे पुढील लक्ष्य दत्त कुपा मोबाईलचे दुकान ‘ठरले आहे. राजेश आंबवकर यांच्या मोबाईल दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील १८९९ रुपये किमतीचा वाय ३१ प्रो विवो कंपनीचा मोबाईल, १५००० रुपये किमतीचा एफ १७सॅमसंग मोबाईल, १३००० रुपये किमतीचा ओपो के १३ एक्स कंपनीचा मोबाईल व इतर किमती सामान असा एकूण ५१४९९ रुपयांचा सामान लंपास केले. मात्र चोरट्याने याच ठिकाणी मोठी चूक केली. त्याने कुलूप फोडण्यासाठी लोखंडी कटावणी आणि लोखंडी पान्ह्याचा वापर केला. ती दोन्ही हत्त्यारे दुकानाबाहेर ठेऊन त्याने पळ काढला. एवढेच नव्हे तर चोरून आणलेले आईस्क्रीम त्याच ठिकाणी खाऊन रिकामा बॉक्स त्याच ठिकाणी टाकला होता.
बिर्याणीवर मारला ताव – बसस्थानकासमोर अगदी असलेल्या अलिशान बिर्याणी हॉटेलच्या मागील बाजूला असलेली जाळी तोडून त्यातून आत प्रवेश करत चोरट्याने त्या ठिकाणी असलेल्या बिर्याणीवर ताव मारला. एवढेच नव्हे तर जाताना बिर्याणी सोबत घेऊन गेला. या ठिकाणी असलेल्या किरकोळ पैशांवर ही त्याने हात मारला. एकाच रात्री ३ दुकानें फोडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्वान आणि फॉरेन्सिक पथक दाखल – चोराचा माग काढण्यासाठी माही नावाच्या श्वानासह त्याला हाताळणारे पोलीस सुदेश सावंत, राजेश नाईक हे या ठिकाणी दाखल झाले. श्वानाला चोराने वापर केलेल्या हात्त्यारांचा वास दिला असता चोरटा ज्या ३ दुकानांच्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी जाऊन एसटी बसस्थानक येथून राष्ट्रीय महाम ार्गाच्या ठिकाणी जाऊन घुटमळल्याने चोरट्याने तेथून पुढील प्रवासासाठी वाहनाचा वापर केला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.