सुनले बेटा पाकिस्तान… बाप तुम्हारा हिंदुस्थान… भारत माता की जय… अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत तिरंगा रॅली पार पडली. या रॅलीमध्ये पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी सहभागी झाले होते. हजारोंच्या संख्येने बांधव या रॅलीत हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. वसुधैव कुटुंबकम म्हणजेच सर्व जगाला आपलं कुटुंब मानणाऱ्या भारत देशानं कधीच युद्धांचा पुरस्कार केला नाही किंवा कुणावर आक्रमण केले नाही. याचा अर्थ लष्करीदृष्ट्या आपण कधीच कमकुवत नव्हतो आणि नाही. आपल्या सुसंस्कृत सहनशीलतेचा फायदा अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानाने घेतला. अतिरेक्यांनी पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि सहनशीलतेचा अंत झाला. यावेळी मात्र भारतीय सैन्याने पूर्ण ताकदिनिशी पाकिस्तानस्थित नऊ अतिरेकी स्थळे उद्ध्वस्त केली.
त्यानंतर, पाकिस्तानी सैन्य करीत असलेल्या भारतीय नागरी वस्त्यांवरील हल्ल्यांचा पूर्णपणे बिमोड करत आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलांचा देशातील नागरिकांना अभिमान आहे. भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवविण्यासाठी शनिवारी रत्नागिरीत तिरंगा रॅली काढण्यात आली. सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, विविध खात्यांचे प्रमुख आणि नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना या रॅलीतून रत्नागिरीकरांचे देशप्रेम पहायला मिळत आहे. देशप्रेमाची ही रॅली आहे. पाकिस्तान भारतावर हल्ला करू शकला नाही. पाकिस्तानचे सर्व मनसुबे भारताने उधळून लावले.
यापुढे संकटकाळात सर्व जनता देशासाठी उभी राहिल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. मारुती मंदिर येथून या रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली माळनाका, जेल रोड नाका मार्गे जयस्तंभ येथे दाखल झाली. त्यानंतर या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमुळे रत्नागिरीत देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक महिला, भगिनींच्या हातात तिरंगा झेंडा फडकताना पहायला मिळाला.