मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी मोठ-मोठ्या विविधांगी झाडांची तोड करण्यात आली. त्यानंतर, सावली निर्माण होण्याच्यादृष्टीने महामार्गाच्या दुतर्फा झाडांची लागवड झालेली नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या चटक्यांमुळे माणसांच्या अंगाची लाहीलाही होत असताना मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकींसोबत चारचाकी वाहने सावलीत उभी करण्यासाठी वाहनचालकांना ठिकठिकाणी धडपड करावी लागत आहे. ‘कोणी सावली देता का सावली?, अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांसह प्रवाशांवर आली आहे. सातत्याने होणार्या अपघातांमुळे नागमोड्या वळणांचा मुबई-गोवा वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे चौपदरीकरण करण्याचा निर्णय होऊन त्याप्रमाणे चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्ग धोकादायक असला तरी, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षराजी आणि झाडांमुळे निर्माण झालेल्या सावलीतून प्रवास करणे आल्हाददायक ठरत होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्यानजीक असलेली आणि चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी मोठमोठी झाडे तोडण्यात आली. तोडलेल्या या झाडांच्या ठिकाणी सावली देणारी नवी झाडे लावण्याबाबत उदासीनता असल्याने त्याचा फटका महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांना बसत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये हवेतील उष्मा कमालीचा वाढला असून रखरखत्या उन्हातून प्रवास करणे नकोसे होत आहे. अशा स्थितीमध्ये दुतर्फा झाडी नसलेल्या महामार्गाने दुपारच्यावेळी प्रवास करणे वाहनचालक आणि प्रवाशांना अडचणीचे ठरत आहेत. उन्हाने तापून जीव कासावीस झाल्यास झाड नसल्याने सावलीमध्ये उभे राहणेही दुरापास्त झालेले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महामार्गावर काही ठिकाणी काजूची झाडे लावण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांची सद्यस्थितीमध्ये झालेली वाढ आणि भविष्यात होणारी वाढ लक्षात घेता ही झाडे सावलीसाठी उपयुक्त नसल्याचे चित्र आहे.