मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने टोलमाफीची घोषणा केली होती. त्यासाठी पासेसचे वाटपही करण्यात आले. मात्र, ही टोलमाफी केवळ कागदावरच राहिली असून, चाकरम ान्यांच्या खात्यातून टोलची रक्कम ऑनलाइन पद्धतीने कापली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुणे-धानोरी येथील रहिवासी असलेले मनोहर पवार हे आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सवासाठी पुण्याहून सावंतवाडीला निघाले होते. त्यांनी पुणे-विश्रांतवाडी पोलीस चौकीतून टोल माफीचा पास घेतला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना हा पास दिला. मनोहर पवारांनी हा पास घेऊन प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान, त्यांनी तीन टोल नाक्यांवर (खेड-शिवापूर, आणेवाडी आणि तसवडे) हा पास दाखवला असता, त्यांना टोल नाक्यावरून जाण्याची परवानगी मिळाली. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून टोलची रक्कम कापल्याचे मेसेज त्यांना आले.
खेड-शिवापूर टोल नाक्यावर १२५ रुपये, आणेवाडी टोल नाक्यावर ८५ रुपये आणि तसवडे टोल नाक्यावर ७५ रुपये असे एकूण २८५ रुपये त्यांच्या खात्यातून डेबिट झाले. राज्य सरकारने जाहीर केलेली टोलमाफी केवळ घोषणाच ठरली असून, प्रत्यक्षात चाकरमान्याना टोल भरावा लागत आहे. केवळ मनोहर पवारच नव्हे, तर अशा अनेक गणेशभक्तांच्या बाबतीत हाच प्रकार घडला असल्याची माहिती आहे. यामुळे, सवंग प्रसिद्धीसाठी घोषणा केली जात असल्याचा आरोप चाकरमान्यांकडून होत आहे. ज्या चाकरमान्यांच्या खात्यातून टोलची रक्कम कापली गेली आहे, ती त्यांना परत मिळणार का? परतीच्या प्रवासालाही टोलमाफी लागू असेल की नाही? या प्रश्नांवर राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडून केली जात आहे.