27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeChiplunदाभोळ खाडीत पर्यटकांना हाऊसबोटीतून सफर

दाभोळ खाडीत पर्यटकांना हाऊसबोटीतून सफर

हाऊस बोटिंगमधून २४ तासासाठी एका खोलीसाठी सुमारे १५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे.

कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तसेच बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने वाशिष्ठी दाभोळ खाडीत हाऊसबोटचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मालदोली प्रभागसंघाच्या महिला हा प्रकल्प राबवणार आहेत. या खाडीत सफर करताना केरळपेक्षाही अप्रतिम निसर्गसौंदर्याची अनुभूती पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाऊसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. चिपळूण येथील कालुस्तेदरम्यान हाऊसबोटीने पर्यटकांना निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे.

हाऊसबोटीतून सफर करताना दाभोळ वाशिष्टी दाभोखाडीतील जैवविविधता, मगरसफर, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवनाची बेटे, नारळी पोफळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेता येणार आहे. एक कोटी खर्चाच्या या हाऊसबोटीमध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून, त्यात प्रशस्त असे बेड, सोफा, बाथरूमची व्यवस्था आहे. फाईव्हस्टार हॉटेलसारखीच व्यवस्था या खोल्यांमध्ये आहे, शिवाय बोटीला पाच फुटाचा रॅम असून पर्यटकांना खाडीत मासेमारी, त्याच पद्धतीने फिश मसाजही करता येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर चांगली सुविधा असून, एखाद्या समूहाला पार्टीदेखील करता येणार आहे.

हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी ३६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन त्याचे मार्केटिंग याबाबतची माहितीही त्यांना दिली आहे. सर्वसाधारण हाऊस बोटिंगमधून २४ तासासाठी एका खोलीसाठी सुमारे १५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. एका बोटीत दोन खोल्या आहेत. पर्यटकांना जेवण, चहा, नाश्ता, वेलकम ड्रिंक कोकम, शाकाहारी, मांसाहारी जेवण, सायंकाळी पुन्हा चहा नाश्ता, रात्रीचे जेवण मिळणार आहे. सुमारे वर्षाकाठी सुमारे एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाऊसबोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.

मालदोली येथील अग्नीपंख महिला प्रभागसंघ हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रभागसंघात ३५५ स्वयंसहाय्यता समूह, १८ ग्रामसंघ, तर ३ हजार ८४७ महिला सहभागी आहेत. सिंधुरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत. प्रकल्पाबाबत जागृती होण्यासाठी कॉफी टेबलबुकची ही निर्मिती केली आहे. बोट सुरक्षिततेसाठी खाडीत फ्लोटिंग जेटीचीदेखील उभारणी केली जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular