महाराष्ट्र शासनाच्या राज्य पर्यटन मंडळा अंतर्गत महाराष्ट्राचा खाद्य संस्कृतीची ओळख, इतिहास जपण्यासाठी महाराष्ट्राचा मास्टरशेफ ही स्पर्धा पारंपारिक महाराष्ट्रीयन पाककृतीवर आधारित घेण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकानी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये तळकोकणातील गावांमधील पन्नास एक वर्ष जुनी, पौष्टिक, आरोग्य वर्धक, पारंपारिक पानगाची पाककृती क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरीतील झरेवाडी गावचे रहिवासी गिरीश शितप आणि टीमने सादर केली. आणि या स्पर्धेमध्ये या पाककृतीने अव्वल स्थान पटकावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातला आणि कोकणातला अस्सल पारंपरिक अप्रतिम चवीचा पानगा या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यटक आणि लोकांपर्यंत पोहोचावा या हेतूने यांनी सहभाग नोंदवला होता.
रेडी टू कूक आणि फास्ट फूडच्या आजच्या जमान्यामध्ये आपली पारंपारिक चव आणि खाद्यसंस्कृती लुप्त होत चालली आहे. हीच पारंपारिक चुलीवरची चव व ग्रामीण खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न झरेवाडी गावरान मसाला या दालनाच्या माध्यमातून गिरीश शितप आणि त्यांची टीम करत आहे. या पाककृतीला या स्पर्धेच्या अव्वलस्थानी निवड करून गौरविण्यात आले याबद्दल गिरीश शितप यांनी समाधान व्यक्त केले व महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा मास्टरशेफ या व्यासपीठाच्या माध्यमातून अशा पारंपारीक पाककृती जपण्याची आणि संवर्धनाची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
त्याचप्रमाणे या स्पर्धेतील सहभागासाठी श्री. ताराचंद ढोबळे आणि शेफ मेघना शेलार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या टीमवर्कमुळेच हे यश प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया गिरीश शितप यांनी व्यक्त करून सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. सदर पाककृतीचा क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक व्हिडिओ रत्नागिरीतील छायाचित्रकार ज्ञानेश कांबळे आणि संकलनकार भूषण बागुल यांनी केले. स्पर्धेच्या नियमानुसार व्हिडीओ बनविणे हे एक प्रकारचे आव्हानच होते, परंतु, ते पेलत अशा अप्रतिम पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून पाककृती स्पर्धेत सादर करण्यात आली.