कुंभार्ली घाटातील रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असली तरीही घाटातील अपघाताची मालिका अजून संपलेली नाही. घाटात मालवाहू ट्रक बंद पडणे, चारचाकी वाहनांचे अपघात हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे घाटात वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे. सोमवारी एका अवघड वळणावर ट्रकला अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्यासाठी चोवीस तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कुंभार्ली घाटातील अपघातामधील ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ती रस्त्यावर उभी केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. कुंभार्ली घाट पावसाळ्यात पूर्णपणे खराब झाला होता. घाटात जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे त्या खड्ड्यात वाहने आदळून बंद पडत होती. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत होता. पावसाळ्यानंतर काही दिवसांनी घाटातील खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती; मात्र घाटात अपघाताचे प्रकार सुरूच आहेत.
सोमवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता चिपळूणहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. हा ट्रक कापसाला दिघेवाडी येथील अमित दिलीप कांबळे यांच्या मालकीचा आहे. मुरादपूर-कुंभारवाडी येथील सचिन सुरेश शिरकर हा चिपळूण ते पुणे ट्रक चालवत असताना कुंभार्ली घाटात आल्यानंतर त्याच्या ट्रकला अपघात झाला. यामध्ये ट्रकचालकाला गंभीर दुखापत झाली असून, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर काही काळ घाटातील वाहतूक थांबली होती. शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. ही क्रेन रस्त्यावरच उभी करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा येत होता. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत ट्रक रस्त्यावरून हटविण्यात आला नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. मंगळवारी सकाळी ट्रक हटविण्यास सुरुवात झाली तेव्हा वाहनांची रांग लागली होती. घटनास्थळावरून पोलिस वाहतुकीचे नियोजन करत होते. त्यामुळे वाहनचालकांना फार काळ कोंडीत अडकावे लागले नाही.