कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण या मार्गावर मुंबई सीएसटी ते मडगांव अशी चाचणी मंगळवारी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधानांच्याहस्ते कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईतील सीएसएमटी ते मडगांव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला जाऊ मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आणि प्रवासी संस्थांनी केली होती. महाराष्ट्रात सध्या ३ मार्गांवरून वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची रेल्वे धावते आहे. कोकण रेल्वे मार्गावरून ती धावावी या मागणीचा सकारात्मक विचार आपण करू असे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले होते.या पार्श्वभूमीवर मंगळवारी १६ मे रोजी कोकण रेल्वे मार्गावरून १६ डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. मंगळवारी पहाटे ५.३५ वा. सीएसएमटी स्थानकातून ही गाडी सुटली. गोव्यात मडगांवला दुपारी २.३० वा. ती पोहोचल्याचे वृत्त आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे कळते.भारतीय रेल्वेने सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस देशभरात अनेक मार्गावरून धावत आहे. या वर्ष अखेर पर्यंत ७५ वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. मुंबई- गांधीनगरदरम्यान पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावू लागली.त्यानंतर मुंबईहून शिर्डीसाठीही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. आता महाराष्ट्रातून चौथी गाडी सुरू होणार आहे. मुंबईहून गोव्यासाठी ही गाडी धावेल असा अंदाज आहे. त्यासाठीची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. त्यामुळे लवकरच मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.