रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले की, ‘जे मंत्री गद्दारी करत आहेत व शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्या मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष संपविण्याचा आणि रामदास कदमच्या अस्तित्वाला संपविण्याचा घाट घातला आहे, ते कोण आहेत हे मला माहित आहे. अशी गंभीर टीका रामदास कदम यांनी अनिल परबांवर केली होती. आम्ही निष्ठावंत असुनही मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख होते असा खेद व्यक्त करत, रामदास कदमांनी अनिल परबांच्या कृत्याचा पाढाच वाचला.
वांद्रेमधून अनिल परब यांनी विधानसभेची किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असं खुलं आव्हानच रामदास कदमांनी केल आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब हे अन्य पक्षाच्या लोकांना साथीला घेऊन शिवसेनेच्या मुळावर उठलेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना रामदास कदम यांनी केलेले आरोप आणि टीकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. रामदास कदम यांनी तुम्हाला गद्दार असं म्हंटल आहे, असं सांगत माध्यमांनी परब यांनी प्रतिक्रिया विचारली तेव्हा परब यांनी, त्यांना काहीही म्हणू दे, मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही. मी शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची तो पक्ष घेईल. कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याच अनिल परब यांनी सपशेल टाळल्याचं पहायला मिळाले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा कदम यांनी परबांवर केलेल्या टीकेबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रकारे शिवसेनेनं त्याठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी झाली आहे. त्याचं नेतृत्व अनिल परब करत आहेत. आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत. त्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. पण रामदास कदम हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेकवेळा विविध प्रकारे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेवर माझ्यासारख्या शिवसैनिकानं बोलणं योग्य ठरणार नाही असे मला वाटते असं नाम. सामंत म्हणाले.