शहरी भागाच्या मानाने ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी मुलांना विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवणे शक्य होते. शिक्षण नोकरी अथवा व्यवसायभिमुख असेल तर चांगल्या ठिकाणी नोकरी मिळू शकते, व्यवसायाची सुरुवात करता येते.
त्यामुळे जर शहरी मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य गुरु आणि अत्यावश्यक सोयीसुविधांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
काल नाम. सामंत यांच्या हस्ते खेडशी, पाली, खानू, नाणिज, कापडगाव, कशेळी आदि गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. रत्नागिरी दौऱ्या दरम्यान नाणीज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य बापू म्हाप, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती परशुराम कदम आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाम. सामंत पुढे बोलताना म्हणाले, ग्रामीण भागात गावागावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत आहेत. विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास कामे होत असतानाच येथील तरुणांना व्यवसाय, रोजगार मिळणे गरजेचे आहे. रत्नागिरीमध्ये शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू झाला आहे. येथील तरुणांना नक्कीच त्याचा फायदा होईल.
शिक्षण घेऊन येथील तरुणांनी आपण उद्योगधंदे, नोकरी करण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध करून दाखवणे गरजेचे आहे. शैक्षणिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संबंधित शासनाने जारी केलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे कळकळीचे आवाहनही त्यांनी त्यावेळी केले.