जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २५१ किलोमीटरच्या २०७ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा क्र. ३ मधून २६५ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशारितीने ३ महिन्यांत जिल्ह्यात शिंदे-फडणवीस सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी ४०० कोटींचा निधी दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांचा समावेश आहे. दोन ते सव्वादोन वर्षे ही योजना काही लोक राबवू शकले नाहीत. हे पाप कोणाचे आहे, माहिती नाही; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राबवली, असा चिमटाही उद्योगमंत्र्यांनी काढला. दूरदृश्यवाहिनीद्वारे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, तत्कालीन सरकारने २०१९ पासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम थांबले होते. ते काम सुरू करण्याचा निर्णय अखेर आम्ही घेतला आहे. या योजनेतून जिल्ह्यात २५१ किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मंडणगड १२.५ कि.मी., दापोली २६.२५ कि.मी., खेड २९ कि.मी., गुहागर २१, चिपळूण ३१, संगमेश्वर ३७, रत्नागिरी ३३, लांजा २६ आणि राजापूर तालुक्यात ३५.१६ कि.मी.चे उद्दिष्ट आहे. २ वर्षांनंतर समितीने योजनेला मंजुरी दिली आहे. मंडणगड तालुक्यासाठी ९ कोटी, खेड १०, दापोली १९ कोटी, गुहागर १६.५० कोटी, चिपळूण २३.२५ कोटी, संगमेश्वर २५ कोटी, रत्नागिरी २५ कोटी, लांजा १८ कोटी, राजापूर २६ कोटी असा एकूण २०७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.’
ते म्हणाले, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून टप्पा दोनमध्ये २०२२-२३ मध्ये ही कामे होणार आहेत. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ही योजना कार्यान्वित होणार असून, त्या कामासाठी डीपीसीतून पैसे दिले जाणार आहेत. केंद्र शासनाची पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा ३ मध्येही शिथिलता आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २६५ कि.मी.चेच रस्ते घेतले जाणार आहेत. रत्नागिरी शहरासह अन्य रस्त्यांच्या कामालाही १०० कोटीनंतर मिळणार आहेत.