कोकण रेल्वेमार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी असा बहुमान मिळवणारी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी (ता. २७) सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मडगाव येथून मुंबईकडे रवाना झाली. रत्नागिरी स्थानकावर या गाडीचे पुष्पवर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले. रत्नागिरीत खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे कांबळे, भाजप प्रबंधक रवींद्र कांबळे, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गोव्यातील मडगाव स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ वरून वंदे भारत एक्स्प्रेस रवाना झाली. या वेळी मडगाव रेल्वेस्थानकावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, खासदार विनय तेंडुलकर, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता आदींनी हजेरी लावली होती. पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य लोको पायलट ए. के. कश्यप यांनी केले. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरी स्थानकावर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी दाखल झाली.
या स्थानकावर पुष्पवर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले. ही गाडी पाहण्यासाठी स्थानकावर गर्दी होती. ढोलताशांच्या गजरात स्वागत झाले. या वेळी पहिले लोको पायलट ए. के. कश्यप यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. अनेक नागरिकांनी वंदे भारत एक्स्प्रेससह सेल्फी काढण्यासह ट्रेनच्या स्वागताचे क्षण मोबाईलमध्ये टिपले. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या स्थानकावर थांबणार आहे. मान्सून वेळापत्रकानुसार, ही गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ५.२५ वा. सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला १५.३० वा. पोहोचेल.